केसांना व्यवस्थित पोषण मिळावे, त्यांची कमी होत चाललेली चमक त्यांना पुन्हा मिळावी आणि केस छान हेल्दी, चमकदार, दाट दिसावेत यासाठी हेअर स्पा केलं जातं. ही हेअर केअर ट्रिटमेंट (beauty tips) जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन केली तर निश्चितच तुम्हाला त्यासाठी कित्येक रूपये मोजावे लागतात. प्रत्येक वेळी एवढे पैसे खर्च करणं जिवावर येतं.. म्हणूनच तर हेअर स्पा करण्यासाठी हा बघा एक अगदी सोपा उपाय.
घरच्या घरी हेअर स्पा क्रिम बनवणं अतिशय सोपं आहे. हा हेअर पॅक जर तुम्ही केसांना नियमितपणे लावला तर पार्लरमधे जाऊन हेअर स्पा केल्यासारची चमक तुमच्या केसांना येऊ शकते. केळी, मध, कोरफड जेल यासारखे घरात अगदी सहज उपलब्ध असणारे साहित्य वापरून आपण हेअर स्पा क्रिम तयार करू शकतो. घरच्या घरी हेअर स्पा क्रिम कसं बनवायचं, याविषयी इन्स्टाग्रामच्या bebeautiful_athome या पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
कसं तयार करायचं होम मेड हेअर स्पा क्रिम
How to make hair spa cream at home?
पिकलेल्या २ केळी घ्या आणि त्याचे तुकडे करा, २ टी स्पून ॲलोव्हेरा जेल, २ टी स्पून खोबरेल तेल किंवा कॅस्टर ऑईल, २ टी स्पून मध हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका. मिक्सर फिरवून या सगळ्या मिश्रणाची एक सैलसर पेस्ट तयार करून घ्या. झालं तयार आपलं होम मेड हेअर स्पा क्रिम.
होम मेड हेअर स्पा क्रिमचा कसा उपयोग करायचा...
- आपण तयार केलेलं हेअर स्पा क्रिम केसांच्या मुळांशी आणि केसांना व्यवस्थित लावून घ्या.
- स्काल्पला आणि केसांना व्यवस्थित क्रिम लावून झालं की केस बांधून टाका आणि शॉवर कॅप घालून घ्या. यामुळे केसांना लावलेलं क्रिम ओलसर राहील.
- शॉवर कॅप नसल्यास प्लॅस्टिक पिशवीचा उपयोगही केस झाकण्यासाठी करता येईल.
- यानंतर एक ते दिड तास हे क्रिम केसांवर तसेच राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
हेअर स्पा क्रिम लावण्याचा फायदा
- दर १० दिवसांतून एकदा आपण हा उपाय करू शकतो.
- केसांना हे क्रिम नियमितपणे लावल्यास केस चमकदार होतात.
- केसांची मुळं पक्की होऊन केसांचं गळणं कमी होतं.
- मध, कोरफड जेल, केळी, तेल या गोष्टी केसांची चांगली वाढ होण्यासाठी पोषक ठरतात.