नखं हा तसं पाहिलं तर आपल्या शरीराचा एक छोटासा भाग. पण तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, तुम्ही वैयक्तिक स्वच्छता कितपत जपता, किंवा तुम्ही कितपत फॅशन लव्हर आहात याचा बरोबर अंदाज तुम्हाला न ओळखणाऱ्या एका तिऱ्हाईत व्यक्तीलाही येऊ शकतो. त्यामुळेच नखांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही नखं स्वच्छ असणं खूप खूप गरजेचं आहे.
नखांची स्वच्छता ठेवण्यासाठी खूप काही खास आणि खर्चिक करण्याची गरज नसते. काही जणी त्यासाठी नियमितपणे मेनिक्युअर करतात. पण एवढे पैसे वारंवार खर्च करण्याची इच्छा नसेल तर हे काही घरगुती उपायही तुमच्या नखांना अतिशय स्वच्छ, चमकदार आणि चकचकीत बनवू शकतात. यासाठी काेणतेही महागडे कॉस्मेटिक्स विकत आणण्याची गरज नाही. तुमच्या घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरून नखे कशी स्वच्छ करायची ते आता पाहूया..
१. लिंबू आणि सोडा
काही जणांची नखे पिवळी दिसू लागतात. नखांचा असा पिवळटपणा कमी करायचा असेल तर सगळ्यात आणि कोमट पाण्यात ५ ते १० मिनिटे नखे बुडवून ठेवा. लिंबाचा रस आणि सोडा हे दोन्ही एकत्र करा आणि लिंबाच्या सालाने ते नखांवर घासा. ३ ते ४ मिनिटे नखे घासल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि लगेचच त्यावर व्हॅसलिन किंवा मॉईश्चरायझर लावा.
२. टुथपेस्ट
टुथपेस्टच्या मदतीनेही नखे खूप उत्तम प्रकारे स्वच्छ करता येतात. नखांची स्वच्छता करण्यासाठी टुथपेस्ट आणि एखाद्या जुन्या टुथब्रशचा वापर करा. यासाठी सगळ्यात आधी नखं ओली करा आणि त्यानंतर प्रत्येक नखावर थेंबभर टुथपेस्ट टाका. टुथब्रश नखांवूर घासून नखं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा.
३. खोबरेल तेल किंवा व्हॅसलिन
नखांची चमक कायम ठेवायची असेल तर त्यांची नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे. त्यामुळेच आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना नखांवर थोडंसं व्हॅसलिन किंवा खोबरेल तेल चोळा. यामुळे नखे कायम चमकदार, चकचकीत दिसतील.