Join us  

रुक्ष-निस्तेज केसांसाठी घरीच करा नैसर्गिक सिरम, महिन्याभरात जाणवेल जादूई फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 5:02 PM

Home made hair Serum for silky and shiny hair : सिरम ही केस चांगले राहण्यासाठी, दिसण्यासाठी एक उपयुक्त गोष्ट आहे.

आपले केस सुंदर, लांबसडक असावेत असं प्रत्येकीला वाटतं. मात्र अनेकदा प्रदूषण, आहारातून मिळणारे अपुरे पोषण, प्रमाणापेक्षा जास्त केमिकल्सचा वापर यांमुळे आपल्या केसांचा पोत बिघडतो. मग केस वाढावेत यासाठी आपण बाजारात मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा शाम्पू यांचा वापर करतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. या केमिकल्स असलेल्या उत्पादनांमुळे केस दिवसेंदिवस खराब व्हायला लागतात. अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. सिरम ही केस चांगले राहण्यासाठी, दिसण्यासाठी एक उपयुक्त गोष्ट आहे (Home made hair Serum for silky and shiny hair).

सिरम म्हणजे नेमकं काय? 

हेअर सीरम एक लिक्विड बेस्ड ट्रिटमेंट आहे. बाहेर विकत मिळणारे महागडे सिरम हे सहसा तेल आणि सिलिकॉन यांना एकत्र करुन बनवलेले असते. तेल आणि सिलिकॉन मिळून केसांवर सुरक्षात्मक थर तयार करतात, ज्यामुळे केसांना गुंतागुंत होण्यापासून रोखता येते. त्याचा वापर केस मऊ, गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यासाठी केला जातो. केस धुतल्यानंतर किंवा कोणत्याही स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापूर्वी केसांवर हेअर सिरम लावले जाते. 

(Image : Google )

शाम्पू आणि कंडिशनरप्रमाणे सिरम दिवसभर केसांवर राहते. केस कोरडे होणे, केसांचा वारंवार गुंता होणे, केस पातळ होणे, केस चिकट होणे यांसारख्या केसांच्या समस्यांवर हेअर सिरम लावणे फायदेशीर ठरते. घरगुती सिरम कसे तयार करायचे हे आपल्याला माहित असेच असे नाही. पण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन एखादे सिरम तयार केले तर त्याचा केस वाढण्यासाठी आणि मजबूत राहण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. पाहूयात घरच्या घरी हे सिरम कसे तयार करायचे. 

१. एका भांड्यात १ कप पाणी घेऊन ते गॅसवर तापायला ठेवायचे. 

२. त्यामध्ये १ चमचा जवस आणि १० ते १२ कडीपत्त्याची पाने घालायची. 

३. १ चमचा मेथ्या घालून हे मिश्रण साधारण ५ मिनीटे चांगले उकळू द्यायचे. 

४. गॅस बंद केल्यावर हे मिश्रण नीट गार होऊ द्यायचे, जवस आणि मेथ्या यांमुळे ते काहीसे चिकटसर होईल.

५. एका भांड्यात गाळणीने हे सगळे नीट गाळून घ्यायचे 

६. यामध्ये १ चमचा ऑलिव्ह ऑईल घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे.

७. हे मिश्रण अगदी २ थेंब हातावर घेऊन केसांना लावायचे. यामुळे केसांचा पोत सुधारण्यास नक्कीच मदत होते. 

८. यातील सर्व घटक हे नैसर्गिक आणि औषधी असल्याने केसांच्या समस्या दूर होण्यासाठी हा अतिशय चांगला असा घरगुती उपाय आहे. 

९. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय केल्यास केसांच्या वाढीसाठी आणि रुक्षपणा कमी होण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी