एरवी मऊ-मुलायम असणारी आपली त्वचा थंडीच्या दिवसांत मात्र खूप तडतडते. कोरड्या पडलेल्या या त्वचेला कोरडेपणामुळे खाज येणे, सालपटं निघणे अशा समस्या हवेतील तापमान कमी झाल्याने भेडसावतात. अशावेळी या त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेत ओलावा निर्माण करण्यासाठी आपण मॉईश्चरायजर किंवा कोल्ड क्रिम आवर्जून लावतो. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि किमतीचे कोल्ड क्रिम मिळतात. यामध्ये बटर, टॉकलेट, कोको, कोरफड असे वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध असतात. पण या क्रिममध्ये इतरही बरेच रासायनिक घटक असतात (Home made Natural Cold Cream for winter season).
या रासायनिक घटकांमुळे त्वचा मऊ पडण्यास नक्कीच मदत होते पण कालांतराने या क्रिम्सच्या अतिवापराने त्वचा काळी पडणे, जास्त कोरडी होणे अशा समस्याही निर्माण होतात. तसंच या क्रिम्सची किंमतही खूप जास्त असल्याने खिशाला भुर्दंड पडतो तो वेगळाच. यासाठीच घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने कोल्ड क्रिम तयार केले तर? आपली आजी या प्रसिद्ध युट्यूब चॅनेलच्या सुमन धामणे आजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कोल्ड क्रिम कसं तयार करायचं ते दाखवतात. पाहूया त्यांची पारंपरिक आणि नैसर्गिक कोल्ड क्रिम तयार करण्याची पद्धत...
१. आयुर्वेदीक दुकानात मिळणारे मेण १ वाटी मेण आणून बारीक चिरुन घ्यायचे आणि एका काचेच्या किंवा स्टीलच्या बाऊलमध्ये ठेवायचे.
२. त्यामध्ये पाव वाटी बदाम तेल आणि पाव वाटी खोबरेल तेल घालायचे आणि सगळे नीट एकत्र करायचे.
३. कढईत पाणी तापवून त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आणि त्यावर हा बाऊल ठेवून हे सगळे चांगले तापवून वितळून घ्यायचे.
४. साधारण १० ते १५ मिनीटांमध्ये गरम केलेले मेण थंड होते, मग त्यात अर्धी वाटी कोरफडीचा गर घालायचा.
५. इलेक्ट्रीक ब्लेंडरने किंवा रवीने हे सगळे चांगले ब्लेंड करुन घ्यायचे आणि एका बरणीत किंवा डबीत काढून ठेवायचे.
६. अतिशय मऊ अशी घरगुती कोल्ड क्रिम काही मिनीटांमध्ये कमीत कमी खर्चात तयार होते. ती चेहऱ्याला आणि शरीराच्या इतर त्वचेलाही लावल्यास चांगला फायदा होईल.