आपण छान दिसायला हवं असं आपल्याला वाटतं. मग आपण प्रामुख्याने चेहरा, मान, हात यांकडे लक्ष देतो. मात्र पायांकडे आपण पुरेसे लक्ष देतोच असे नाही. कधी उन्हामुळे, कधी जास्त वेळ पाण्यात काम केल्याने तर कधी धुळीमुळे पाय पार काळे पडतात. रोजच्या धावपळीत आपले पायांकडे लक्ष जातेच असे नाही. मात्र काळे पडलेले पाय अजिबातच चांगले दिसत नाहीत. त्यावर झालेले टॅनिंग काढले तर पायही छान स्वच्छ गोरे दिसतात आणि आपल्या सौंदर्यात भरच पडते. पेडीक्युअर करुन घ्यायचे असेल तर पार्लरमध्ये बराच खर्च करावा लागतो. त्यापेक्षा घरच्या घरी काही सोप्या उपायांनी पायावरचे टॅनिंग घालवता आले तर चांगले नाही का? पाहूया घरच्या घरी पायाचे टॅनिंग घालवण्याचे काही सोपे उपाय (Home Remedies for Dark Feet)...
१. पपईचा उपयोग
पपई खाण्यासाठी ज्याप्रमाणे चांगली असते तितकीच ती त्वचेसाठीही उपयुक्त असते. त्यामुळे अनेकदा आपण फेसपॅकमध्येही पपईचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे पायांचे टॅनिंग कमी करण्यासाठी पपईचा उपयोग करता येतो. वाटीभर पपई स्मॅश करुन घ्यावी त्यामध्ये २ चमचे दही आणि १ चमचा गुलाब पाणी घालावे. चिमूटभर हळद घालून हे मिश्रण एकजीव करावे आणि पायांना लावून ठेवावे. १५ ते २० मिनीटे हा पॅक पायांवर तसाच ठेवून नंतर गार पाण्याने पाय धुवून टाकावेत. यामुळे पायांचे टॅनिंग जाण्यास निश्चितच मदत होईल.
२. संत्र्याच्या सालींचा उपयोग
संत्र्याची साले वाळवून त्याची पावडर तयार करावी. २ चमचे पावडर घेऊन त्यामध्ये दूध घालून चांगली पेस्ट बनवावी. ही पेस्ट पायावर सगळीकडे लावावी. पूर्णपणे वाळल्यानंतर पाय धुवावेत. यामुळे पायांचे टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते तसेच संत्र्याच्या सालांमध्येही नॅचरल ब्लिचिंग घटक असल्याने ही साले त्वचेच्या तक्रारींवर उपयुक्त असतात.