Join us  

केस गळतीने वैतागलात, अनेक उपाय करुन थकलात? घ्या ४ सोपे घरगुती उपाय, महिनाभरात पाहा बदल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 10:03 AM

Home Remedies for Hair Fall : महागड्या केमिकल ट्रीटमेंटपेक्षा घरगुती, नैसर्गिक उपाय केव्हाही फायदेशीर

ठळक मुद्देकेसांच्या मूळांना कोरफडीचा गर लावल्यास केसगळती कमी होण्यास मदत होते. केमिकल उपचारांपेक्षा घरगुती उपाय केव्हाही जास्त चांगले

केस गळणे ही महिला आणि पुरुषांची एक मोठी समस्या आहे. घरात, बेडवर, ऑफीसमध्ये सगळीकडे सतत केस पडलेले दिसतात. कधी केस विंचरताना तर कधी पुसताना, कधी नुसता केसात घात घातला तरी केसांचा मोठा पुंजका हातात येतो (Hair Care Tips). प्रदूषण, केसांसाठी वापरली जाणारी रासायनिक उत्पादने, चुकीची जीवनशैली, केसांचे आणि आरोग्याचे न होणारे पोषण, ताणतणाव यांचा परिणाम केसांवर होतो आणि केस तुटतात किंवा गळतात. केस गळाल्याने ते पातळ तर होतातच पण अनेकांना केस गळतीमुळे टक्कल पडण्याची समस्याही उद्भवते (Home Remedies for Hair Fall). 

(Image : Google)

तर हे अगदीच सामान्य 

साधारणपणे दिवसाला एका व्यक्तीच्या डोक्यावरील ५० ते १०० केस गळतात. जितके केस गळतात त्याच्या काही प्रमाणात नव्याने येतातही. मात्र यापेक्षा खूप जास्त प्रमाणात तुमचे केस गळत असतील तर काळजी करण्यासारखी बाब आहे. केसांच्या गळतीवर वेळीच योग्य ते उपाय केले नाहीत तर गळण्याचे प्रमाण वाढते आणि केस जास्तच विरळ होत जातात. केस विरळ झाले की आपण आहोत त्यापेक्षा जास्त वयाचे वाटायला लागतो.  

केस गळतीवर घरच्या घरी करता येतील असे उपाय

१. वेगवेगळ्या तेलांचा वापर करा

आपण साधारणपणे केसांना एकाच प्रकारचे तेल लावतो. त्यापेक्षा खोबरेल तेल. बदाम तेल, एरंडेल तेल, आवळ्याचे तेल अशा वेगवेगळ्या तेलाने केसांना मालिश करा. मालिश करताना बोटांच्या टोकाने केसांच्या मुळांशी हलका दाब दिल्यास मुळांचा रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत होईल आणि केसांचे गळणे कमी होण्यास मदत होईल. 

२. मेथ्याचे दाणे 

मेथ्या चवीला कडू असल्या तरी आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या विविध गोष्टींसाठी मेथ्या उपयुक्त असतात. केसांची वाढ आणि नव्याने केस येण्यासाठी मेथ्याचे दाणे फायदेशीर असतात. मेथीमध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटीनिक अॅसिड केसांची वाढ होण्यास फायदेशीर ठरते. मेथ्या भिजवून त्याची पेस्ट करुन ती केसांच्या मूळांशी लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

३. कांद्याचा रस 

केस गळणे, विरळ होणे किंवा टक्कल पडणे यांसारख्या समस्यांसाठी कांद्याचा रस खूप उपयुक्त ठरू शकतो. केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. केस गळण्यासाठी कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा नाश करण्याचे गुणधर्म कांद्याच्या रसामध्ये असल्याने त्याचा चांगला उपयोग होतो. केस धुण्याआधी काही वेळ केसांच्या मूळांना कांद्याचा रस लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

४. कोरफड

कोरफड आपण घरात सहज लावू शकतो असे रोप आहे. त्वचा तसेच केसांच्या विविध तक्रारींवर उपयुक्त असणारी कोरफड आपण नैसर्गिक उपाय म्हणून नक्कीच वापरु शकतो. केसांच्या वाढीसाठी कोरफड अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे केसांच्या मूळांना कोरफडीचा गर लावल्यास केसगळती कमी होण्यास मदत होते. यातील एन्झाइम्स केस वाढण्यासाठी फायदेशीर असतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी