केस कापणं सोपं पण कापलेले केस पुन्हा वाढवणं खूपच अवघड बाब. वर्षानुवर्ष प्रयत्न करुनही , महागाचे हेअर प्रोडक्टस वापरुनही लवकर केस वाढत नाहीत असा अनुभव आहे. आता केस वाढणार नाहीत म्हणून निराश झाला असाल तर तसं होण्याची अजिबात गरज नाही. हेअर एक्सपर्ट म्हटल्यानंतर ज्यांचं नाव सर्वात आधी डोळ्यासमोर येतं त्या जावेद हबीब यांनी केस लवकर वाढवण्याचा एक घरगुती उपाय सांगितला आहे. इतका सोपा उपाय जो करण्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात. जावेद हबीब म्हणतात या सोप्या उपायानं केस लांब होण्याची आपली इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल. जावेद हबीब यांनी सांगितलेला हा घरगुती उपाय अर्थातच नैसर्गिक आहे. ओलं नारळ आणि मध यांचा वापर करुन त्यांनी हा लांब केसांचा उपाय सांगितला आहे.
Image: Google
ओलं नारळ+ मध= लांब केस
जावेद हबीब यांनी केस वाढवण्यासाठी सांगितलेला उपाय करण्यासाठी ओल्या नारळाचं अर्धा कप दूध आणि एक चमचा मध घ्यावं. य दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्र करव्यात. नारळाचं दूध करताना दाटसर आणि क्रीमसारखं एकदम मऊ असायला हवं. हे दूध करुन केसांना लावणं अगदीच सोपं आहे.
नारळाचं दूध आणि मध एकत्र केल्यानंतर आपण जशी केसांना मेहेंदी लावतो त्याप्रमाणे हे मिश्रण हातानं किंवा ब्रशच्या सहाय्यानं लावावं. मेहेंदी लावताना कंगव्याच्या टोकाचा वापर करुन जसे थोडे थोडे केस हातात घेऊन मेहेंदी लावतो त्याप्रमाणेच साधारण अर्धा इंच जाडीचे केस हातात घेऊन त्यांच्या मुळांना हे मिश्रण लावावं. संपूर्ण डोक्याला हे मिश्रण लावून झालं की गरम पाण्यात सूती रुमाल भिजवून तो चांगला पिळून घ्यावा. आणि हा गरम रुमाल 20 मिनिटं केसांना बांधून ठेवावा.
वीस मिनिटानंतर सौम्य शाम्पूचा वापर करत केस धुवावेत. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास केसांची चमक, लांबी आणि जाडी वाढते. उद्देश फक्त केस वाढवण्याचा असला तरी जावेद हबीब यांनी सांगितलेल्या या उपयानं तीन गोष्टी साध्य होतात.
Image: Google
नारळाचं दूध कसं करणार
नारळाचं दूध करण्यासाठी ओलं खोबरं घ्यावं. त्याचे तुकडे करुन ते मिक्सरच्या भांड्यामधे घालावं. त्यात थोडं गाईचं दूध घालून ते वाटावं. केसांना लावल्यानंतर ते ओघळून जाऊ नये म्हणून ते थोडं दाटसर ठेवावं लागतं. खोबरं वाटताना जर दुधाचा वापर करायचा नसेल तर पाणी वापरलं तरी चालतं. पण जावेद हबीब म्हणतात की खोबरं वाटताना त्यात दूध घातलं तर केसांना लॅक्टिक अँसिड आणि प्रथिनांचा पुरवठा होऊन केसांचं पोषणही होतं.नारळाचं दूध करताना जावेद हबीब सांगतात की दोन इंच लांब असे खोबर्याचे तीन तुकडे घ्यावेत. अर्धा कप दूध घ्यावं आणि ते एकत्र मिक्सरमधे वाटावं. मिश्रण दाट आणि एकदम मऊसर असायला हवं. हे नारळाचं दूध एका कपात काढून नंतर त्यात एक चमचा मध घालावं.