कोरियातल्या तरूण मुली असो किंवा वृद्ध बायका. प्रत्येकीची स्कीन अगदी तुकतुकीत, तलम आणि चमकदार दिसते. या मुलींच्या चेहऱ्यावर ना कोणते डाग दिसतात ना कुठले व्रण आणि वांग. या मुलींना पिंपल्सही येत नसतील का, असे त्यांच्याकडे पाहून कायम वाटते. अवघ्या जगातल्या सौंदर्य जगतालाही हाच प्रश्न पडला आणि तिथूनच या कोरियन ब्युटीच्या सौंदर्याचे सिक्रेट शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. सगळ्या संशोधनातून केवळ एवढेच लक्षात आले की, आपल्या आजूबाजूला सहजपणे सापडणाऱ्या पदार्थांचा उपयोग करून आपण कोरियन मुलींसारखी चमकदार त्वचा मिळवू शकतो.
कोरियन ब्युटी स्किन मिळविण्यासाठी हे उपाय करून पहा
१. ऑईल बेस क्लिन्जर
कोरियन महिला ऑईल बेस क्लिन्जर वापरण्यावर भर देतात. अतिशय सोप्या पद्धतीने हे क्लिन्जर बनविलेले असते. ऑलिव्ह ऑईल, स्वीट अलमंड ऑईल आणि हहोबा ऑईल प्रत्येकी १ टेबलस्पून घ्यावे. हे मिश्रण चांगले एकत्र केले की, कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाते.
२. वॉटर बेस क्लिन्जर
ऑईल बेस क्लिन्जर वापरून चेहरा स्वच्छ केल्यानंतर वॉटर बेस क्लिन्जर वापरावे. चेहऱ्यावरील अतिरिक्त ऑईल आणि ऑईल बेस क्लिन्जर वापरूनही चेहऱ्यावर चिटकून बसलेले अतिरिक्त धुलीकण वॉटर बेस क्लिन्जरने स्वच्छ होतात. मध आणि दूध यांचे समप्रमाण घेऊन वॉटर बेस क्लिन्जर बनविता येते. मध आणि दूध यांचे मिश्रण दोन बोटांनी गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर फिरवावे. ५ मिनिटे अशा पद्धतीने मसाज केली की कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
३. नॅचरल स्क्रबर
बेसन पीठ आणि मुलतानी माती वापरून बनविलेला लेप कोरियन महिला स्क्रबर म्हणून वापरतात. वरीलप्रमाणे चेहरा स्वच्छ धुवून घेतला की, १ टेबल स्पून बेसन पीठ, १ टेबल स्पून मुलतानी माती एकत्र करावी. यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवावी आणि ती चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून लावावी. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते. साधारणपणे १० मिनिटे हा लेप चेहऱ्यावर लावून ठेवावा. त्यानंतर हलक्या हाताने चोळून लेप काढावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
४. असे बनवा टोनर
चेहऱ्याचे स्क्रब झाल्यानंतर कोरियन महिला चेहऱ्याला कोणतेही महागडे टोनर लावत नाहीत. ॲप्पल साईडर व्हिनेगर, ग्रीन टी किंवा रोझ वॉटर यांचा उपयोग टोनर म्हणून केला जातो. चेहऱ्याचे स्क्रब झाल्यानंतर यापैकी कोणताही एक पदार्थ चेहऱ्यावर टोनर म्हणून लावावा. यामुळे स्क्रबमुळे उघडी झालेली त्वचेवरील छिद्रे झाकली जातात आणि त्वचेचे पीएच लेव्हल बॅलेन्स होते. हे नैसर्गिक टोनर त्वचेला रिफ्रेश करते.
५. आता लावा मास्क
कोरियन महिला यासाठी डीआयवाय शीट मास्कचा वापर करतात. २ टेबलस्पून ग्लिसरिन, २ टेबलस्पून कॅमोमील टी, दोन ड्रॉप लव्हेंडर ऑईल एकत्र करून घ्यायचे. या मिश्रणात शीट मास्क भिजवून ठेवायचा आणि तो चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवायचा. यामुळे त्वचेचे डिहायड्रेशन होत नाही आणि त्वचा कोरडी पडत नाही.
६. ॲलोव्हेरा जेल
हे सर्व उपाय केल्यानंतर चेहऱ्यावर ॲलोव्हेरा जेल हलक्या हाताने लावावे. हहोबा ऑईल आणि शीया बटर यांचा वापरही यासाठी करता येतो.
७. सुरकूत्या घालविण्यासाठी करा हा सोपा उपाय
डोळ्यांच्या भोवती येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यासाठी कोरियन महिला हा मस्त आणि अतिशय स्वस्त उपाय करतात. कदाचित यामुळेच या महिलांच्या त्वचेवर खूपच उशीरा सुरकुत्या पडायला सुरूवात होते आणि त्यामुळे त्यांच्या वयाचा अंदाज मुळीच बांधता येत नाही. तुम्हीही हा भन्नाट उपाय करून वय लपवू शकता. यासाठी फक्त एवढेच करा की, एक चमचा अलमंड ऑईल, व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल आणि कोरफडीचा गर एकत्रित करून डोळ्यांच्या त्वचेभोवती असणाऱ्या सुरकुत्यांवर लावा आणि १० मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. या उपायाने सुरकुत्या दिसणे हळू हळू कमी होते.