Join us  

गौरी-गणपतीमध्ये चेहऱ्यावर ग्लो हवा; ४ घरगुती उपाय-चेहरा होईल चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 4:01 PM

Home Remedies To Increase Glow of The Face Skin Care Tips : पार्लरच्या महागड्या उपचारांपेक्षा घरगुती उपाय नक्की ट्राय करा...

ठळक मुद्देसणावारांना एकमेकांना भेटणे होत असल्याने आपला लूक छान असायला हवा.पार्लरचे महागडे उपचार करण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक उपाय करणे केव्हाही चांगले

गौरी-गणपती म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक. बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना या सणामध्ये आपणीही छान दिसावे असे प्रत्येकाला वाटते. गौरी-गणपतीच्या निमित्ताने एकमेकांकडे दर्शनाला आणि आरतीला जायचे असल्याने हे १० दिवस आपण नातेवाईकांकडे आणि मित्रमंडळींकडे जातो. पारंपरिक कपडे घालून हा सण साजरा करताना आपला चेहराही छान ग्लोईंग आणि चमकदार असावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो (Skin Care Tips). कधी पार्लरमध्ये जाऊन आपण हजारो रुपये खर्च करतो तर कधी महागडी उत्पादने वापरुन चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या लपवण्याचा प्रयत्न करतो. पण घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन काही सोपे उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात हे उपाय कोणते (Home Remedies To Increase Glow of The Face)....

१. काकडीचा रस

काकडी आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असते त्याचप्रमाणे सौंदर्यासाठीही काकडीचा अतिशय चांगला उपयोग होतो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण तर जास्त असतेच पण व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असल्याने काकडीचा रस चेहऱ्याला लावल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यासाठी काकडीच्या रसात लिंबू पिळावे. मग हा रस चेहऱ्यावर वीस मिनीटांसाठी लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्य़ाने धुवावा. यामुळे चेहऱ्याचे टॅनिंग तर जाईलच पण चेहऱ्याला गारवा मिळेल. 

२. नारळाचे दूध 

नारळाच्या दुधामुळे त्वचेचे पोषण होण्यास मदत होते. तसेच त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठीही नारळाच्या दुधाचा अतिशय चांगला उपयोग होतो. हे दूध कॉटन बॉलने चेहऱ्यावर हळूवार लावावे. हे दूध चेहऱ्यावरच वाळेपर्यंत ठेवावे त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. 

३. बेसन, हळद आणि दुधाचा फेसपॅक

हा पारंपरिक फेसपॅक चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. एका वाटीत दोन चमचे बेसन घ्या, त्यामध्ये एक चिमुट हळद घाला, त्यानंतर यामध्ये कच्चे दूध घाला. तयार झालेला हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा. वाळेपर्यंत हा पॅक तसाच ठेवा. मग चेहरा आणि मान गार पाण्याने धुवून टाका. चेहऱ्यावर झालेल्या टॅनिंगपासून सुटका व्हावी यासाठी हा होममेड फेसपॅक अतिशय उपयुक्त ठरतो. 

(Image : Google)

४. लिंबाचा रस, मध आणि साखर

एक चमचा लिंबाचा रस, थोडासा मध आणि त्यामध्ये साखर घालून हे मिश्रण चांगल्यारितीने एकत्र करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर एकसारखे लावा. लिंबामध्ये असलेले सायट्रीक अॅसिड त्वचेची चमक वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. तर त्वचेतील मॉईश्चर टिकून ठेवण्याचे काम मधामुळे होते. साखर स्क्रब म्हणून काम करत असल्याने या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी