कोंडा ही बहुतांश महिला आणि पुरुषांमध्ये आढळणारी एक अतिशय सामान्य समस्या आहे. थंडीच्या दिवसांत तर कोरडेपणामुळे कोंड्याचे प्रमाण इतके वाढते की केसांत कंगवा घातला की कपड्यांवर कोंड्याचा थर पडतो. त्वचेचे अन्नातून पुरेसे पोषण न होणे, शरीरात काही घटकांची कमतरता असणे, केमिकल असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर अशा वेगवेगळ्या कारणांनी केसांत कोंडा होतो. एकदा हा कोंडा झाला की तो काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. मग तेल लावणे, वेगवेगळे शाम्पू ट्राय करणे, घरगुती उपाय असे एक ना अनेक उपाय केले जातात. मात्र तरीही हा कोंडा कमी होतच नाही आणि आपण हैराण होतो. पण आज आपण असा एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे केसातला कोंडा कमी होण्यास निश्चितच मदत होते. आता हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा ते पाहूया (Home Remedy For Dandruff Problem)..
कोंडा कमी होण्यासाठी उपाय
१ चमचा कडुलिंबाची पावडर, १ चमचा तुळशीची पावडर, १ चमचा मध आणि १ चमचा कोरफडीचा गर एकत्र करायचा. हे मिश्रण चांगले एकजीव झाले की ते केसांच्या मुळांना लावायचे. १५ ते २० मिनीटे हे मिश्रण तसेच ठेवून नंतर साध्या पाण्याने केस धुवायचे. आठवड्यातून २ वेळा हा पॅक केसांना लावल्यास कोंडा कमी होण्यास त्याची चांगली मदत होईल. हा पॅक लावण्याआधी केस शाम्पू आणि कंडीशनरने धुतलेले असावेत. तसेच पॅक लावल्यावर किमान काही वेळ तो तसाच ठेवायला हवा, अन्यथा त्याचे आवश्यक ते परीणाम मिळणार नाहीत.
म्हणून हा पॅक फायदेशीर..
१. कडुलिंब आणि तुळशीच्या पावडरमध्ये अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. आपल्या त्वचेला कोणते इन्फेक्शन असेल तर हा पॅक लावल्याने हे इन्फेक्शन कमी होते.
२. कोंड्यामुळे केसांत खूप खाज येत असेल तर ती कमी होण्यासही या पॅकचा चांगला उपयोग होतो.
३. कोंडा कमी होण्याबरोबरच केस मजबूत होण्यासाठी हा पॅक अतिशय फायदेशीर ठरतो.
४. हल्ली कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या असते. केस पांढरे होण्यापासून रक्षण करण्यासाठी हा पॅक फायदेशीर ठरतो.