चहा म्हणजे अनेकांसाठी अमृतासमान असतो. अशा लोकांना सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहाचा कप हातात लागतो. इतकेच नाही, तर दिवसभरातही अतिशय आवडीने चहा पिणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. काही जणांच्या घरात तर कोणत्याही प्रहरी चहाचं आधन असतंच असतं. आता हा चहा गाळल्यावर त्याचा चोथा गाळणीमध्ये तसाच उरतो. आपण हा चोथा कचऱ्यात फेकून देतो. मात्र सौंदर्यासाठी या चोथ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो हे आपल्याला कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. आपल्या डोळ्यांखाली काही ना काही कारणाने डार्क सर्कल येतात (Home Remedy For Dark Circles).
बरेचदा ही डार्क सर्कल आपल्या सौंदर्यात बाधा आणणारी ठरतात. नकळत यामुळे आपला चेहरा, डोळे फ्रेश न दिसता आपण थकलेले, आजारी किंवा निराश दिसतो. डार्क सर्कल येण्यामागे ताणतणाव, अपुरी झोप, पोषण न होणे अशी अनेक कारणे असली तरी ती घालवण्यासाठी आपण काही ना काही उपाय करतच असतो. मेकअप करुन ही डार्क सर्कल घालवण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन त्यावर उपाययोजना केलेल्या केव्हाही चांगल्या. पाहूया चहाच्या चोथ्याचा ही डार्क सर्कल घालवण्यासाठी कसा फायदा होतो आणि त्याचा नेमका कसा वापर करायचा.
कसा करायचा वापर ?
१. चहा पावडरचा चोथा फेकून न देता अंडर आय क्रिममध्ये मिसळावा. हे मिश्रण डोळ्यांना लावून रात्रभर तसेच ठेवावे. यामुळे आपल्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईल आणि डार्क सर्कल पासूनही आपली सुटका होईल.
२. वापरलेली चहा पावडर उन्हात वाळवावी, त्यानंतर यामध्ये १ चमचा मध मिसळून हे मिश्रण डोळ्यांखाली लावावे. काही वेळाने हे मिश्रण वाळेल, त्यानंतर डोळे पाण्याने स्वच्छ धुवून टाकावेत.
फायदे
१. चहा पावडर ही नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचेच्या समस्यांसाठी ती फायदेशीर ठरते.
२. यामध्ये असणारे कॅफीन आणि अँटीऑक्सिडंटस त्वचा आरोग्यदायी आणि तरुण ठेवण्यास मदत करतात.
३. चहा पावडरमध्ये अँटी एजिंग, अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असल्याने हे स्कीनमधील डेड सेल्स काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे चहा पावडरचा स्क्रब लावल्यावर डार्क सर्कल निघून जाण्यास मदत होते.
४. चेहऱ्यावर निर्माण होणारे जास्तीचे तेल निघून जाण्यासाठी चहा पावडर फायदेशीर ठरते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे यांसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.