Join us  

चेहऱ्यावरचे केस खूप वाढलेत, चारचौघात वाईट दिसतात? ३ सोपे नैसर्गिक उपाय, चेहरा दिसेल नितळ-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 4:51 PM

Home Remedy For Facial Hair : पार्लरमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय...

आपला चेहरा नितळ, सुंदर असावा असं प्रत्येकीला वाटतं. पण काही ना काही कारणांनी कधी चेहऱ्यावर पुरळ येतात तर कधी चेहरा रुक्ष होतो. कधी सुरकुत्यांमुळे आपण वयस्कर दिसतो तर कधी चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढल्याने आपल्या सौंदर्यात बाधा येते. बरेचदा हार्मोन्सचे असंतुलन, अनुवंशिकता किंवा अन्य काही कारणांनी चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात. हे केस विरळ आणि पुसट असतील तर ठिक नाहीतर ते दिसू नयेत म्हणून आपल्याला पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस कराव्या लागतात. ब्लीच करुन हे केस झाकण्याची एक सोय असते अन्यथा व्हॅक्सिंग, थ्रेडींग करुन हे केस काढता येतात. कायमचेच काढायचे असतील तर लेझर ट्रीटमेंट हा एक उपाय असतो. मात्र त्यासाठी प्रमाणाबाहेर खर्च येतो. पण असे करण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे नैसर्गिक उपाय केल्यास निश्चतच या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते. पाहूया हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे (Home Remedy For Facial Hair). 

१. केळं आणि दलिया 

एका बाऊलमध्ये २ चमचे दलिया घ्या आणि त्यामध्ये पिकलेले केळे कुस्करुन घाला. आता हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. १० मिनीटांनी ते वाळल्यावर चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर पुन्हा एक कोट लावा आणि वाळल्यानंतर उलट्या दिशेने हा कोट काढण्याचा प्रयत्न करा. नियमितपणे हा उपाय केल्याने केस हळूहळू केसांची वाढ कमी होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

२. मध आणि साखर 

एका बाऊलमध्ये २ चमचे साखर, एक चमचा मध आणि आणि १ चमचा पाणी घालून अगदी ३० सेकंदांसाठी हे मिश्रण गरम करा. हे सगळे चांगले एकजीव झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा. आता त्यावर कापसाची स्ट्रीप लावून हे मिश्रण काढा त्यासोबत चेहऱ्यावरील केस निघून येण्यास मदत होईल. बाजारात मिळणाऱ्या वॅक्समध्ये त्वचेला हानिकारक घटक असण्याची शक्यता असते. मात्र हे नैसर्गिक आणि सुरक्षित व्हॅक्स असल्याने तुम्ही याचा वापर चेहऱ्यासाठी निश्चितच करु शकता. 

३. पपई 

पपईचा गर घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद, ३ चमचे कोरफडीचा गर घाला. या सगळ्याची चांगली एकजीव पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत त्याठिकाणी ही पेस्ट लावा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर केस ज्या दिशेने वाढतात त्या दिशेने रगडून हा पॅक काढून टाका. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले केस निघून जाण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीमेकअप टिप्सत्वचेची काळजी