केसातला कोंडा ही महिलांना भेडसावणारी सौंदर्यातील एक महत्त्वाची समस्या आहे. ज्यांच्या डोक्यात कोंडा असतो त्यांनी कधीही केस विंचरले तरी पाठीवर आणि कपड्यांवर हा कोंडा पडतो. त्यामुळे आपली फार चिडचिड होते. अनेकदा तर केस कितीही धुतले, तेल लेवले तरी आपल्या आजुबाजूच्या लोकांना हा कोंडा सहज दिसून येतो. मग कधी यासाठी हेअर स्पा करण्याचा नाहीतर महागडे शाम्पू वापरण्याचा सल्ला काही जण देतात. केसांच्या खालची त्वचा कोरडी होणे आणि त्याचे पापुद्रे निघणे यालाच आपण केसांत कोंडा झाला असे म्हणतो (Home Remedy For Hair Dandruff Problem). दरवेळी काही महागडेच उपाय केले पाहीजेत असे नाही, तर काही सोप्या उपायांनी कोंड्यावर इलाज करता येणे शक्य आहे. पाहूयात कोंडा कमी होण्यासाठी स्वयंपाकघरातील मेथ्या हा पदार्थ उपयुक्त ठरतो आणि त्याचा वापर कसा करायचा. मेथ्या चवीला कडू असल्या तरी आरोग्यासाठी त्या अतिशय उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे कोंड्याच्या तक्रारींसाठीही मेथ्याचे दाणे फायदेशीर असतात.
मेथीचे दाणे आणि लिंबू
१. एका वाटीत एक मोठा चमचा मेथीचे दाणे पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा.२. सकाळी उठल्यावर हे दाणे मिक्सरमधून काढून त्याची बारीक पेस्ट करुन घ्या.३. यामध्ये एका लिंबाचा रस घाला आणि सगळे एकजीव करा.४. हे मिश्रण आपले केस आणि केसांच्या मूळांशी लावा. ५. ३० मिनीटे मिश्रण तसेच ठेवून त्यानंतर एखाद्या हलक्या शाम्पूने धुवून टाका. ६. हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा केल्यास तुम्हाला त्याचा निश्चितच फरक दिसेल.
मेथीचे दाणे आणि कोरफड
१. एका वाटीत दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजत घाला.२. सकाळी उठल्यावर हे दाणे मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करुन घ्या.३. या पेस्टमध्ये कोरफडीचा गर घाला आणि सगळे एकजीव करा.४. हे मिश्रण केसांना आणि डोक्याच्या त्वचेला लावा आणि ३० मिनीटांसाठी तसेच ठेवा. ५. हलक्या शाम्पूने केस धुवून टाका.