Join us  

कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क.. ६ फायदे, रुक्ष - बेजान केस होतील सुंदर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 2:05 PM

केसांचा कोरडेपणा (hair dryness) घालवण्यासाठी महागडी उत्पादने, खर्चिक उपाय करण्याची गरज नसते. केस मऊ मुलायम करण्यासाठी बागेतील कोरफड आणि घरातील खोबरेल तेल ( coconut oil and aloe vera gel hair mask for soft and silky hair) पुरेसं आहे. 

ठळक मुद्देकोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाच्या हेअर मास्कमुळे केसांना पोषण मिळतं.कोरफडमुळे केसांच्या मुळांशी जिवाणुसंसर्ग होत नाही.घरच्याघरी केस मऊ मुलायम करण्यासाठीचा हा सोपा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा. 

केसांना हात लावल्यावर ते जर कोरडे/ रुक्ष जाणवत असतील तर याचाच अर्थ केसांचं सौंदर्य कमी झालेलं आहे. केस सुंदर दिसण्यासाठी आधी ते मऊ मुलायम होणं आवश्यक आहे. अनेक कारणांनी केस कोरडे  (hair dryness) होतात. केसातील रुक्षपणा घालवण्यासाठी मग पार्लरमध्ये जावून हेअर ट्रीटमेण्ट घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही. पण हेअर ट्रीटमेण्टमुळे (hair treatment)  केस तात्पुरते मऊ मुलायम होत असले तरी त्याचे केसांवर दीर्घकालीन वाईट परिणाम होतात. केस खराब होतात. तात्पुरतं सौंदर्य देणाऱ्या पण मुळात केसांचा पोत खराब करणाऱ्या अशा हेअर ट्रीटमेण्टला घरगुती उपयांचा (home remedy for remove hair dryness)  पर्याय सहज देता येतो. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कोरफड गर आणि खोबऱ्याच्या तेलाचा एकत्रित हेअर मास्क (coconut oil and aloe vera gel hair mask)  तयार करता येतो. या हेअर मास्कने केवळ केस मऊ मुलायमच होतात असं नाही तर केसांना आणखी 6 फायदे (benefits of coconut oil and aloe vera gel hair mask)  मिळतात.

Image: Google

कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क कसा तयार करावा?

कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वात आधी कोरफडची पाती कापावी. त्यातून गर काढावा. हा गर एका वाटीत घ्यावा यात खोबऱ्याचं तेल घालावं. हा हेअर मास्क अधिक प्रभावी होण्यासाठी ई जीवनसत्वाची कॅप्सूल फोडून घालावी.  या तिन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्रित करुन हा लेप केसांना लावावा. केवळ केसांनाच नाही तर केसांच्या मुळाशीही हा लेप लावणं आवश्यक आहे. केसांना हा लेप लावल्यानंतर 40 मिनिटांनी केस साध्या पाण्यानं स्वच्छ धुवावेत.  आठवड्यातून किमान 2 वेळा हा लेप केसांना लावल्यास एक नाही तर अनेक फायदे होतात. 

Image: Google

हेअर मास्कचे फायदे काय?

1. कोरफडच्या गरामध्ये अ, क आणि ब जीवनसत्वं असतात. त्यामुळे कोरफडचा समावेश असलेला हेअर पॅक लावल्यास केसांना पोषण मिळतं. 

2. कोरफड जेलमध्ये असलेल्या ॲण्टिऑक्सिड्ण्टसमुळे केसात आर्द्रता निर्माण होते. 

3. कोरफडच्या गरात जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे केसांचं जिवाणुंच्या संसर्गापासून संरक्षण होतं. 

Image: Google

4. या हेअर पॅकमधील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याच्या तेलात बुरशीरोधक गुणधर्म असतात. त्यामुळे केसातील कोंड्यावर हा लेप फायदेशीर ठरतो. 

5. खोबऱ्याच्या तेलातही ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. या गुणधर्मामुळे केस माॅश्चराइज होतात.

6. केसांसाठीच्या या लेपात ई जीवनसत्वाची कॅप्सूल वापरलेली असल्यानं केस मजबूत होतात. घरच्याघरी केस सुरक्षितपणे मऊ मुलायम करण्यासाठी कोरफड जेल आणि खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क हा घरगुती उपाय अनेक फायदे देणारा ठरतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी