वातावरण, प्रदूषण, दुर्लक्ष, अति केमिकलयुक्त घटकांचा वापर या कारणांनी केस खराब होतात. केसात कोंडा होणं, केस गळायला लागणं, केस पांढरे होणं,केसांना दोन तोंडं फुटणं अशा केसांच्या समस्या निर्माण झाल्या की केसांची जाणीवपूर्वक काळजी घेणं आवश्यक असतं. केसांची काळजी घेण्यासाठी बाजारातून भारी कॅटेगिरीतले, उत्तम ब्रॅण्डचे शाम्पू आणले जातात. पण अशा शाम्पूत जास्तच केमिकल्स असल्यामुळे केसांच्या समस्या कमी न होता आणखी वाढतात.हे टाळण्यासाठी बाहेरचे अति केमिकल्सयुक्त शाम्पू वापरणं सोडून द्यायला हवं. याचा अर्थ केसांना शाम्पू लावायचा नाही असा नाही. केसांसाठीच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगी आणि परिणामकारक शाम्पू घरी तयार करता येतात.
Image: Google
घरच्याघरी हर्बल आणि औषधी गुणधर्माचे दोन प्रकारचे शाम्पू तयार करता येतात. केस मजबूत् करण्यासाठी शिकेकाई रिठा यांचा वापर करुन तयार होणारा शाम्पू वापरता येतो तर केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी कांद्याच्या सालांचा वापर करुन औषधी गुणधर्मांचा शाम्पू तयार करता येतो.
Image: Google
शिकेकाई रिठ्याचा शाम्पू
शिकेकाई रिठ्याचा शाम्पू तयार करण्यासाठी 100 ग्रॅम सुका आवळा, 100 ग्रॅम रिठे, 100 ग्रॅम् शिकेकाई आणि 100 ग्रॅम मेथ्या घ्याव्यात. या घटकांचा वापर शाम्पू करण्यासाठी करायचा असल्यानं या वस्तू नीट कोरड्या, वाळलेल्या असाव्यात. या सर्व वस्तू आयुर्वेदिक सामग्रीच्या दुकानात सहज मिळतात.
Image: Google
शाम्पू तयार करण्यासाठी शिकेकाई, रिठे, आवळा आणि मेथीदाणे रात्रभर एका भांड्यात भिजत घालावेत. रात्रभर भिजवावेत. दुसऱ्या दिवशी सर्व साहित्य मऊ होतं. सकाळी उठल्यानंतर यात आणखी एक ग्लास पाणी घालावं. हे मिश्रण मंद आचेवर उकळावं. अर्धा तास मिश्रण उकळू द्यावं. अर्धा तास मिश्रण उकळल्यावर गॅस बंद करावा. मिश्रण थंडं होवू द्यावं. थंडं झालं की एका काचेच्या बाटलीत मिश्रण गाळून भरावं. ही बाटली फ्रिजमध्ये ठेवावी.
Image: Google
रीठे शिकेकाई शाम्पूचा फायदा
रीठे, शिकेकाई, आवळा आणि मेथ्या दाणे यांचा वापर करुन तयार करण्यात येणारा शाम्पू केसांसाठी वापरल्यास केस गळणं थांबतात. नवीन केस उगवतात. रिठ्यामध्ये नैसर्गिक स्वच्छता घटक असतात. केस नैसर्गिक रित्या धुवून स्वच्छ करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. केसांमधील अतिरित्क तेल आणि अस्वच्छता या शाम्पूच्य वापरानं निघून जाते. रिठे शिकेकाई या शाम्पूचा एरवी वापरतो त्या केमिकल्सयुक्त शाम्पइतका फेस होत नसला तरी केस स्वच्छ करण्यासाठी हा शाम्पू फायदेशीर ठरतो. यामुळे केस स्वच्छ तर होतातच सोबतच केसांचं पोषणही होतं.
Image: Google
कांद्याच्या सालांचा शाम्पू
केस मुळापासून स्वच्छ होण्यासाठी आणि केसांशी निगडित समस्या सोडवण्यासाठी कांद्याच्या सालांचा शाम्पू फायदेशीर ठरतो. कांद्याच्या सालांचा शाम्पू तयार करण्यासाठी 4 - 5 कांद्याची सालं, 100 ग्रॅम मेथ्या, 50 मिली कोरफड जेल, 50 ग्रॅम चहा पावडर, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सुल, 50 मिली बेबी शाम्पू एवढी सामग्री घ्यावी.
Image: Google
कांद्याच्या सालांचा शाम्पू तयार करण्यासाठी एका भांड्यात कांद्याची सालं , मेथी दाणे, चहा पावडर आणि पाणी घालून पाण्याला उकळी आणावी. पाणी उकळलं की त्याचा रंग बदलतो. पाण्यात कांद्याच्या सालींचा अर्क उतरतो. पाण्याचा रंग बदलला की गॅस बंद करावा. पाणी थंडं होवू द्यावं. थंडं झालेलं पाणी एका बाटलीत गाळून भरावं . या पाण्यात कोरफडीचा गर आणि विटॅमिन ई कॅप्सूल आणि बेबी शाम्पू घालावा. हे सर्व चांगलं हलवून घ्यावं. झाकण लावून बाटली 8-10 तास तशीच ठेवावी. शाम्पू तयार केल्यानंतर 10 तासांनी त्याचा वापर करावा. हा शाम्पू आठवडाभर चांगला राहातो.
Image: Google
कांद्याच्या सालांच्या शाम्पूचा फायदा
कांद्याच्या सालांपासून तयार केलेल्या या शाम्पूमध्ये विकर चांगल्या प्रमाणात असतात. हे विकर केसांच्या मुळापर्यंत जावून केस मजबूत करतात. केसांचं नैसर्गिक पोषण होण्यासाठी कांद्याच्या सालांच्या शाम्पूचा फायदा होतो. या शाम्पूनं केसातील कोंड्याची समस्या जाते. केस वाढतात. कांद्याच्या सालींमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस गुणधर्म असल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. कांद्याच्या सालांच्या शाम्पूतून ई, ए, आणि क जीवनसत्वं मिळून केस दाट होतात.