त्वचेचा प्रकार तेलकट (oily skin problems) असेल तर अनेक सौंदर्यविषयक समस्यांना सतत सामोरं जावं लागतं. पावसाळ्यात तर दमट आणि ओलसर वातावरणानं तेलकट त्वचेचे खूपच हाल होतात. तेलकट त्वचेसाठी ब्यूटी प्रोडक्टस निवडतानाही दहा वेळा विचार करावा लागतो. याचं कारण ब्यूटी प्रोडक्टसमध्ये असणाऱ्या केमिकल्सच्या वापरामुळे त्वचा आणखी खराब होते. त्वचा स्वच्छ ठेवण्याचा प्रभावी उपाय म्हणजे स्क्रब (scrub for skin care) करणं. पण तेलकट त्वचेसाठी कोणतंही स्क्रब वापरुन चालत नाही. चुकीचं स्क्रब वापरलं, जास्त केमिकलयुक्त स्क्रब वापरलं तर त्वचेचा पीएच स्तरही बिघडतो. तेलकट त्वचेसाठी असलेला हा धोका टाळण्यासाठी घरच्याघरी स्क्रब तयार करणं हा सोपा, सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे. यासाठी घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करुन तेलकट त्वचेसाठी काॅफी पावडर स्क्रब (homemade coffee powder scrub for oily skin) तयार करता येतं.
Image: Google
काॅफी पावडर स्क्रब कसं तयार करावं?
घरच्याघरी काॅफी स्क्रब तयार करण्यासाठी 2 ते 3 चमचे काॅफी पावडर, 2 चमचे खोबऱ्याचं तेल, अर्धा चमचा मध आणि 1 ते दीड चमचा लिंबाचा रस घ्यावा. काॅफी स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीत काॅफी पावडर आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन घ्यावं. नंतर त्यात मध आणि लिंबाचा रस घालावा. मिश्रण जास्त घट्ट वाटत असल्यास त्यात थोडं गुलाबाचं पाणी घालावं. तयार झालेलं स्क्रब चेहेऱ्याला गोलाकार मसाज करत लावावं. 5 ते 7 मिनिटं मसाज केल्यानंतर 15 मिनिटं मिश्रण चेहेऱ्यावर राहू द्यावं आणि मग चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
काॅफी पावडर स्क्रबचे फायदे काय?
1. काॅफी पावडरने स्क्रब केल्यास चेहेरऱ्याच्या त्वचेवरील रंध्रं स्वच्छ होतात. त्यामुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या होत नाही.
2. काॅफी पावडर आणि मधामुळे चेहेऱ्याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह गतिमान होतो. त्यामुळे त्वचा निरोगी होते.
3. काॅफी पावडरमध्ये सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. काॅफी पावडर स्क्रब केल्यानं त्वचेवरील सूज कमी होते.
4. काॅफी पावडर स्क्रबमधील लिंबू आणि मधाच्या उपयोगानं त्वचेचा संसर्ग होत नाही. लिंबात असलेल्या क जीवनसत्वामुळे त्वचेचा रंग उजळतो. तसेच चेहेऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात.
5. मध आणि खोबरेल तेलाचा एकत्रित परिणाम म्हणून चेहेऱ्यावर काळे डाग पडत नाही.