Join us  

गव्हाच्या पिठाने घरच्याघरी करा 5 स्टेप्स फेशियल, कणकेचा मऊ पोत त्वचेला देतो खास ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2022 2:22 PM

दुसऱ्या दिवशी काही खास कार्यक्रम असला तर आदल्या दिवशी संध्याकाळी 5 स्टेप्स आटा फेशियल करावं. दुसऱ्या दिवशी त्वचेवर हमखास दिसेल नैसर्गिक ग्लो!

ठळक मुद्देकणकेचा वापर करुन होणारं आटा फेशियल हे संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी करावं, तर परिणाम उत्तम होतात.आटा फेशियल करताना वापरली जाणारी कणिक कोंड्यासह असावी. कणिक चाळलेली नको. कणकेमुळे त्वचा कोरडी पडते. म्हणूनच कणिक थोडी आणि इतर सर्व घटक जास्त असं प्रमाण आटा फेशियल करताना वापरल्या जाणाऱ्या फेसक्रीमचं असतं. 

  काही खास कार्यक्रम आहे,  घरात पार्टी आहे, बाहेर पार्टीला जायचंय इतकंच काय तर ऑफिसमध्ये मीटिंग आहे तर आपला चेहेरा फ्रेश दिसायला हवा, चेहेऱ्यावर मरगळ दिसायला नको, त्वचा मस्त ग्लो करायला हवी असं वाटतं. चेहरा खास दिसण्यासाठी मग तर पार्लरचीच ट्रीटमेण्ट लागेल ना... पण त्याची काही गरज नाही. हल्ली सर्व छोटी मोठी कारणं एकत्र केली तर निघणारा साधारण हिशोब हेच सांगतो की आपला चेहरा सतत फ्रेशच दिसायला हवा. त्वचा ग्लो करायला हवी. मग त्यासाठी पार्लरशिवाय घरगुती उपाय शोधायला हवा. असे अनेक घरगुती उपाय आहेत. त्यातला कणकेचा उपाय हा सहज आणि परिणामकारक आहे.

कणकेचा उपयोग करुन 5 स्टेप्स 'आटा फेशियल करता येतं. हे फेशियल संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याआधी करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या चेहेऱ्यावर नैसर्गिक चमक नक्की दिसेल,  मुळत कणकेचा उपयोग करुन चेहऱ्याच्या उजळपणा वाढवता येतो, चेहऱ्यावरील नकोसे केस काढून टाकता येतात.  कणिक , त्याचा उपयोग करुन होणारं आटा फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चालू शकतं. 

Image: Google

1. आटा क्लीन्जिंग

फेशियल करण्याआधी चेहेरा स्वच्छ करावा लागतो. चेहेऱ्यावरील धूळ, माती निघून गेली तर फेशियलच्या इतर स्टेप्सचा चांगला परिणाम दिसतो. फेशियलसाठी क्लीन्जिंग करण्यासाठी चेहरा आधी पाण्यानं स्वच्छ धुवावा. नंतर 1 चमचा कणिक घ्यावी. त्यात 2 चमचे कच्चं दूध घालून पेस्ट करावी. ही पेस्ट खूप पातळ असायला नको. ही पेस्ट चेहेऱ्याला लावून ती 5 मिनिटं राहू द्यावी. 5 मिनिटानंतर हात ओले करावेत . हातानं चेहेरा हळूवार घासावा. दोन मिनिट मसाज केल्यानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. फेशियलच्या प्रत्येक स्टेप्समध्ये वापरली जाणारी कणिक ही चाळून घेतलेली नसावी. ती कोंड्यासह असल्यास तिचा फायदा होतो. 

Image: Google

2. आटा स्क्रब

क्लीन्जिंगनंतर दुसरी स्टेप्स असते स्क्रब करण्याची. स्क्रब करण्यासाठी 1 चमचा कणिक, 1 चमचा कणकेतील कोंडा घ्यावा. दोन्ही गोष्टी एकत्र करुन त्यात 4 ते 5 ऑलिव्ह तेलाचे थेंब घालावेत. कणकेच्या वापरानं चेहेऱ्याची त्वचा थोडी कोरडी होते. म्हणूनच त्वचेत ओलावा निर्माण होण्यासाठी टिकून राहाण्यासाठी स्क्रबचं मिश्रण करताना त्यात तेलाचे थेंब टाकले जातात. जर त्वचा मुळातच कोरडी असेल तर तो कोरडेपणा वाढू नये यासाठी कोणतंही इतर तेल न वापरता ऑलिव्ह तेल वापरावं. ऑलिव्ह तेलामुळे त्वचा उजळते. ऑलिव्ह तेलाची जर कोणास ॲलर्जी असल्यास त्यांनी स्क्रबच्या मिश्रणात ऑलिव्ह ऐवजी खोबऱ्याचं तेल वापरवं. या मिश्रणानं हलक्या हातानं चेहऱ्याचा 5-7 मिनिटं मसाज  करावा. मसाज करुन झाल्यावर 5 मिनिटं चेहेरा तसाच ठेवून मग चेहेरा गार पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

3. आटा क्रीम

कणकेच्या सहाय्याने स्क्रब करुन चेहेरा एक्सफोलिएट केल्यानंतर चेहेऱ्यावर क्रीम लावणं गरजेचं असतं. आटा क्रीम तयार करण्यासाठी अर्धा चमचा  कणिक घ्यावी. त्यात 1चमहा ग्लिसरीन घालावं. ग्लिसरीनची जर कोणाला ॲलर्जी असेल तर त्यांनी त्यात ग्लिसरीन ऐवजी ॲलोवेरा जेल घालावं. आटा फेशियल करताना क्लीन्जर असो की क्रीम प्रत्येक प्रकारात कणिक वापरलेली असली तरी इतर घटकाच्या तुलनेत तिचं प्रमाण कमी आहे. कणिक आणि ॲलोव्हेरा जेल /ग्लिसरीन एकत्र करुन मग ती चेहेऱ्यावर हलका मसाज करत लावावी. या क्रीमनं साधारणत: 5-7 मिनिटं मसाज करावा. नंतर चेहेरा ओल्या कापडानं पुसावा किंवा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

4. 2 मिनिटं वाफ घ्यावी

फेस क्रीमनं चेहेऱ्याचा मसाज केल्यानंतर वाफ घेणं आवश्यक आहे. घरी स्टीमर नसेल तर भाड्यात पाणी करुन त्या पाण्यानं वाफ घेता येते. 2-3 वाफ घ्यावी. वाफ घेऊन झाल्यावर 2 मिनिटं थांबावं. नंतर कापसाचा बोळा घेऊन त्याने चेहेरा स्वच्छ पुसावा.

Image: Google

5. आटा फेसपॅक

फेशिअल करताना सर्वात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे चेहेऱ्याला फेस पॅक लावणं. या फेसपॅकमधून त्वचेस पोषक घटक मिळणं आवश्यक असतात. यासाठी आटा फेसपॅक महत्त्वाचे असतात. आटा फेसपॅकमुळे स्वच्छ झालेल्या त्वचेची नैसर्गिक तेलनिर्मिती मर्यादित राहाते. त्वचेची चमकही वाढते. जर चेहेऱ्यावर काळे डाग, मुरुम पुटकुळ्यांचे डाग असतील तर एक चमचा कणकेत 2 चमचे दही, 1 चमचा मध घालून हे मिश्रण एकजीव करावं. हा फेसपॅक हळुवारपणे चेहेऱ्यास लावून 15-20 मिनिटं ठेवून मग चेहेरा ओल्या कापडानं पुसावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. आटा फेसपॅकमुळे त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि तरुण होते. त्वचा घट्ट होते. ती सैल पडत नाही, त्वचेवर सुरकुत्या पडत नाही. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी