पाणी स्वच्छ करणाऱ्या वाॅटर प्युरीफायरच्या जगात आजही पाणी निर्जंतुक करण्यासाठी तुरटीचा (alum) उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. याच तुरटीचा उपयोग त्वचेसाठीही (skin benefits of alum) करता येतो. तुरटीत असलेल्या जिवाणुविरोधी गुणधर्मामुळे त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. त्वचा तरुण दिसण्यासाठी तुरटी उपयोगी ठरते. तुरटीत असलेल्या ॲस्ट्रीन्जन्ट गुणधर्मामुळे जखमा भरुन येण्यासाठीही तुरटीचा उपयोग होतो. हातापायाची त्वचा स्वच्छ करण्यासाठी, मऊ करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये जावून महागडे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर हे सौंदर्योपचार केले जातात. पण तुरटीत असलेल्या गुणधर्मांमुळे तुरटीचा उपयोग करुन घरच्याघरी मेनिक्युअर आणि पेडिक्युअर (alum use for manicure and pedicure at home करुन हातापायाची त्वचा मऊ मुलायम करता येते. सौंदर्य तज्ज्ञ पूनम चुघ यांनी तुरटीचा उपयोग करुन घरच्याघरी मेनिक्युअर आणि पेडिक्युअर (how to do manicure and pedicure with alum at home) कसं करायचं याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
Image: Google
तुरटीच्या सहाय्याने मेनिक्युअर करताना..
तुरटीच्या सहाय्याने मेनिक्युअर करताना 1 मोठी वाटी तुरटीचं पाणी, 1 छोटा चमचा सैंधव मीठ आणि 1 छोटा चमचा गुलाबपाणी घ्यावं. सर्वात आधी तुरटी अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवावी. अर्ध्या तासानंतर तुरटीच्या पाण्यात सैंधव मीठ आणि गुलाबपाणी घालावं.
Image: Google
या पाण्यात हात बुडवून ठेवण्यापूर्वी एका वाटीत थोडा बेकिंग सोडा आणि कोरफड जेल घ्यावं. ते चांगलं एकत्र करुन या मिश्रणानं हाताला स्क्रब करावं. हात स्क्रब केल्यानंतर 10 मिनिटं तुरटीच्या तयार केलेल्या पाण्यात हात बुडवून ठेवावे. नंतर हात रुमालानं कोरडे करुन हाताला माॅश्चरायझर लावावं.
Image: Google
तुरटीने पेडिक्युअर करताना..
तुरटीच्या सहाय्याने पेडिक्युअर करताना 1 बादली पाणी, 1 मोठा तुरटीचा खडा, 1 छोटा चमचा मध आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रस घ्यावा. सर्वात आधी पाण्यात तुरटी बुडवून अर्धा तास ठेवावी. नंतर तुरटीच्या पाण्यात मध आणि लिंबाचा रस घालावा. या पाण्यात पाय बुडवून ठेवण्याआधी एका वाटीत मध आणि काॅफी पावडर घेऊन ते एकत्र करुन त्याचं मिश्रण तयार करावं. या मिश्रणानं पायाला स्क्रब करावं. पाय स्क्रब केल्यानंतर तुरटीच्या तयार पाण्यात पाय बुडवून ठेवावे. तुरटीच्या पाण्यात दहा मिनिटं पाय बुडवून ठेवल्यानंतर पाय रुमालानं पुसून घ्यावेत. नंतर पायाला माॅश्चरायझर किंवा पायाची क्रीम लावावी. तुरटीनं पेडिक्युअर केल्यानं पायाच्या भेगा निघून जातात.
Image: Google
ज्यांच्या पायांना सतत घाम येतो किंवा ज्यांचे पाय तेलकट असतात त्यांच्यासाठी तुरटीचं पेडिक्युअर हा उत्तम उपाय आहे. पण ज्यांच्या पायाची त्वचा कोरडी आहे त्यांनी तुरटीने पेडिक्युअर करु नये असं पूनम चुघ सांगतात. तुरटीच्या सहाय्यानं मेनिक्युअर आणि पेडिक्युअर केल्यान त्वचेचा काळपटपणा निघून जातो. हातापायाची त्वचा मऊ होते आणि त्वचेला चमक येते.