आपली त्वचा संवेदनशील आहे हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. पण काही विशिष्ट सौंदर्य उत्पादनं वापरल्यास, वातावरणात बदल झाल्यास त्वचा लालसर पडणं, खाजणं, चेहेऱ्यावर मुरुम , पुटकुळ्या, फोड येणं असे विविध समस्या उदभवतात. याकडे तात्कालिक समस्या समजून दुर्लक्ष करु नये. उलट आपली त्वचा कदाचित संवेदनशील असेल हे जाणून आधी त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणं, आपली त्वचा नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. संवेदनशील त्वचा असूनही आपण जर त्यापासून अनभिज्ञ राहिलो तर त्वचेबाबत उत्पादनं निवडताना चुका होतात आणि त्याचा परिणाम त्वचा कायमस्वरुपी खराब होण्यावर होतो.
त्वचेबाबत जागरुक राहाणं गरजेचं असतं. काही लक्षणांवरुन आपली त्वचा संवेदनशील असू शकते हे सहज ओळखता येतं.
त्वचा संवेदनशील असते तेव्हा ..
- छोट्या छोट्या गोष्टींवर त्वचा प्रतिक्रिया देते. साबण, कपडे किंवा भांड्याचा साबण, सुगंधी द्रव्यं असलेली उत्पादनं, अत्तरं, स्प्रे इतकंच नाही तर घरगुती पिठं वापरल्यास त्वचा प्रतिक्रिया देते. हवामान बदलल्यास , वारा लागाल्यास त्वचेवर लगेच विपरित परिणाम होतात हे लक्षात आल्यास आपली त्वचा संवेदनशील आहे हे ओळखून त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- त्वचेवर सतत लाली येणं. जसे लाल पूरळ येणं, लाल फोड येणं, ते खाजणं हे संवेदनशील त्वचेचं लक्षण आहे. याबाबत लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर संवेदनशील त्वचा आहे हे तर समजतंच शिवाय त्वचेवर लाली येण्यास कोणते घटक कारणीभूत आहे हेही समजून घेता येतात.
-त्वचा कोरडी पडून खाज येते. विशेषतं साबण, लोशन स्वरुपातील क्लिजिंग उत्पादनं वापरल्यास त्वचेला खाज येते. ही खाज जावी म्हणून गरम पाण्यानं आंघोळ केली जाते. त्याचा तर त्वचेवर विपरित परिणाम होतो. वातावरण थंड असल्यास, हवा कोरडी असल्यास जास्तच अंग खाजतं. खाजवल्यानं त्वचेवर दाह जाणवायला लागतो.
- त्वचेला टोचल्यासारखं जाणवतं. विशेषत: जेल स्वरुपातील,अल्कोहोल मिश्रित उत्पादनं, अॅण्टिएजिंग उत्पादनं वापरल्यास त्वचेची आग होते. ही आग तात्पूरती असते. पण यावरुनही आपली त्वचा ही संवेदनशील प्रकारची आहे हे सहज ओळखता येते. तज्ज्ञ म्हणतात की असा त्रास जाणवल्यास लगेच चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.
- त्वचा कोरडी पडते. कोरड्या त्वचेमूळेही चेहेऱ्यावर मुरुम फोड येतात. कोरडेपणानं त्वचा सुरक्षित राहू शकत नाही. हिवाळ्यातल्या थंड आणि कोरड्या हवेमुळे तर त्वचेचं फारच नुकसान होतं.
- सतत कसली तरी अॅलर्जी येवून त्वचेवर रॅशेस येणं हे या संवेदनशील त्वचेचं मुख्य लक्षण. चेहेऱ्यावर लावण्याच्या क्रीममुळे त्वचेला अॅलर्जी होणे. या रॅशेस कधी कधी तात्पुरत्या स्वरुपाच्या असतात तर काही दीर्घ किंवा कायम स्वरुपीच्या येतात.
- चेहेऱ्यावर सतत मुरुम , फोड , पुटकुळ्या येतात. .हे फोड सुरुवातीला लाल असतात आणि मग पिकतात. या प्रकारामुळे चेहेऱ्यावर कायम स्वरुपी डाग पडणं, खड्डे पडणं हे परिणाम संभवतात. त्वचेच्या बाबतीत अशी समस्या वारंवार उद्भवत असल्यास लगेच त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे. याबाबतीतला उशीर त्वचेच्या समस्यांचं संकट तीव्र करतं.
- त्वचा कोरडी तर पडतेच शिवाय खाज येऊन पापूद्रे निघतात. शरीरावर कोंड्यासारखं वाटणं. सतत त्वचा खरवडली तर मग जखमा होतात. दुखतात.
- सूर्यप्रकाशानं त्वचा जळते. जर त्वचेला आधीच खूप खाज असेल, त्वचेचे पापुद्रे निघत असतील तर सूर्यप्रकाशानं त्वचेचं आणखीनच नुकसान होतं. अशा परिस्थितीत सनस्क्रीनच महत्त्वाचं असतं. पण संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना सनस्क्रीनमधील काही घटकांचीही अॅलर्जी होते.
संवेदनशील त्वचेची ही काही मुख्य लक्षणं आहेत. यातील कोणतंही एक लक्षण स्वत:बाबत जाणवलं तर जराही उशीर न करता त्वचाविकार तज्ज्ञ गाठणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षणं दिसत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा जास्त खराब होते आणि त्वचेचं झालेलं नुकसान भरुन येत नाही.