केसगळती ही हल्ली अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अगदी लहान मुलींपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच केस मोठ्या प्रमाणात गळताना दिसतात. केसांत नुसता कंगवा घातला तरी हातात केसांचा पुंजका येतो. महिला-पुरुष सगळ्यांच्याच बाबतीत ही समस्या वाढताना दिसत आहे. केस इतक्या जास्त प्रमाणात गळाले की आता आपल्या डोक्यावर केस राहणार की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. मग आपण कोणीही सांगितलेले, ऑनलाइन समजलेले असे कोणतेही उपचार करतो आणि केस येण्याची वाट पाहत राहतो (How do you stop hair loss foods to prevent hair fall).
विविध प्रकारची तेलं, सिरम, शाम्पू असे काही ना काही लावून फरक पडावा अशी आपली इच्छा असते. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. मग केस गळतीसाठी नेमकं काय करावं याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ असलेले डॉ. मिहीर खत्री १ सोपा उपाय सांगतात. आहारातून शरीराचे चांगले पोषण झाले तर केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात समावेश करता येईल असे घटक वापरुन लाडू करायचे. हे लाडू चवीला तर चांगले लागतातच पण केसांसाठी आणि आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असतात.
लाडू करण्याची सोपी पद्धत
१. अळीव, काळे तीळ, आक्रोड आणि बदाम या चारही गोष्टी चांगल्या भाजून घ्यायच्या. गार झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये पावडर तयार करायची.
२. मग खजूर तूपामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि त्याची डावाने दाबून पेस्ट तयार करायची.
३. मिक्सर केलेली पावडर या खजूरांमध्ये घालायची आणि सगळ्यात शेवटी त्यात खोबऱ्याचा किस घालायचा.
४. हे सगळे चांगले एकजीव करायचे आणि त्याचे लहान आकाराचे लाडू तयार करायचे. सकाळी आणि संध्याकाळी रोज १-१ लाडू खायचा.
५. अगदी ३ ते ५ दिवसांत तुम्हाला केसगळती कमी झाल्याचे जाणवेल. साधारण १ ते १.५ महिना हे लाडू खाल्ल्यानंतर केसगळती पूर्णपणे थांबण्यास मदत होईल.
६. त्यानंतरही तुम्हाला केसांची चांगली वाढ व्हावी आणि ते चांगले राहावेत असं वाटत असेल तर तुम्ही हे लाडू खाऊ शकता.
७. केवळ केसांसाठीच नाही तर यातील सर्व घटक आरोग्यासाठीही उपयुक्त असल्याने हे लाडू तुम्ही आवर्जून खायला हवेत.