डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
डॉक्टर गेले काही महिने मधून मधून चेहऱ्यावर लालसर पुरळ येतंय आणि खाज सुटते आहे..मग आपोआप कमी होतं,परत येतं.. कळतच नाहीये का होतं?" खरंतर पुरळ,खाज हा माझा विषय नाही पण आमच्या पेशंटस् आम्हाला सगळ्या प्रकारच्या शंका विचारतातच. हे चेहऱ्यावर पुरळ ,खाज अजून दोन तीन जणींनी सांगितल्यावर यावर जरा शोध घेतला. तेव्हा असं लक्षात आलं की या सगळ्याजणी जी सौंदर्य प्रसाधने वापरत होत्या त्यामध्ये parabens ही केमिकल्स वापरली जात होती. आता काय आहे parabens हा प्रकार असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या बऱ्याच वस्तूंमध्ये parabens हे प्रिझर्वेटीव्ह म्हणून वापरले जातात.
उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, केसांसाठी व शेविंगसाठी लागणारी प्रसाधने, डिओड्रंटस आणि स्वच्छतेसाठी लागणारी वेगवेगळी उत्पादने, डिटर्जंट पावडर यांमध्ये हा घटक वापरला जातो. Parabens हे मानवी शरीरात खूप सहज शोषले जातात आणि त्यांची रासायनिक रचना मानवी शरीरातील हॉर्मोन्सशी मिळती जुळती असल्यामुळे ते शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन धोक्यात आणू शकतात. यांना endocrine disruptersअसं नाव आहे आणि हे धोकादायक असतात. जास्त काळ हा घटक शरीराच्या संपर्कात राहिल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये जननक्षमतेवर विपरीत परिणाम, त्वचेचे वेगवेगळे आजार, क्वचित कॅन्सर यांचा समावेश होतो. त्यामुळे शरीराच्या संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये parabens नाहीत ना याची खातरजमा करणे आवश्यक आहे.
हल्ली paraben नसलेली बरीच सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत, फक्त खरेदी करताना बारकाईने बघून घेणे महत्वाचे. Parabens सारखेच दुसरे केमिकल म्हणजे sodium lauryl sulphate.हे surfactant म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या बऱ्याच वस्तूंमध्ये असते. पाणी आणि तेल हे एकत्र करायचे असेल तर surfactantचा वापर गरजेचा असतो. त्यामुळे तयार होणाऱ्या पदार्थांना फेस येतो. टूथपेस्ट, शाम्पू, फेसवॉश यांसारख्या बऱ्याच गोष्टींमध्ये हे सर्रास वापरले जाते. या केमिकल मुळे काही जणांना त्वचेला खाज येणे, पुरळ उठणे, सूज येणे असे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे ज्यांना असे त्रास होतात त्यांनी आपली दैनंदिन वापरातल्या गोष्टी जरूर तपासून पहाव्यात. व्हिटॅमिन घेऊन सुद्धा सतत तोंड येत असेल म्हणजे अल्सर्स होत असतील तर sodium lauryl sulphate नसलेली टूथपेस्ट वापरून बघायला हरकत नाही.
( लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत)