जर केस मोठे असतील तर महिला अनेक दिवस केस धुत नाहीत ज्यामुळे स्काल्पवर घाण साचू लागते आणि केस गळू लागतात. मात्र जर केस दररोज धुतले तर जास्त धुण्यामुळे केस गळती देखील वाढू शकते. अशा परिस्थितीत, अनेकदा प्रश्न पडतो की, आठवड्यातून नेमके किती वेळा केस धुवावेत आणि केस धुण्याशी संबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? केस खूपच जास्त गळत असतील तर काय करायचं हे जाणून घेऊया...
आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
केस किती वेळा धुवायचे हे तुमचे केस कसे आहेत यावर अवलंबून आहे. जर केस खूप तेलकट असतील तर ते दररोज धुता येतात, परंतु जर केस खूप कोरडे असतील तर आठवड्यातून दोनदा केस धुणं फायदेशीर ठरते. कुरळे केस ३ किंवा ४ दिवसांनी एकदा धुता येतात आणि जर केस सामान्य असतील तर आठवड्यातून २ किंवा ३ वेळा केस धुण्यास हरकत नाही.
तुम्हाला केस धुण्याची गरज आहे की नाही हे तुम्ही तुमचे केस पाहून देखील ओळखू शकता. जर तुमचे केस तेलकट होत असतील आणि तुमच्या स्काल्पवर घाण किंवा कोंडा जमा होत असेल तर केस धुण्याची वेळ आली आहे. जर २-३ दिवसांनंतरही केसांवर तेलकटपणा जाणवत नसेल आणि केस पूर्वीसारखेच दिसत असतील, तर तुम्ही आणखी काही दिवस केस न धुता राहू शकता.
'या' गोष्टी ठेवा लक्षात
- केस धुण्यामुळे होणारी केस गळती टाळण्यासाठी, योग्य शाम्पू वापरणं महत्त्वाचं आहे.
- जर तुम्ही तुमच्या केसांच्या प्रकारानुसार शाम्पू निवडला नाही तर केस गळती वाढू शकते. यामुळे अनेक वेळा केस व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत आणि दररोज ते धुण्याची गरज भासते.
- केसांच्या टोकांवर शाम्पू लावून घासण्याची गरज नाही. असं केलं तर तुमचे केस कोरडे दिसतील, खराब होतील आणि केसाला फाटे फुटण्याची शक्यता वाढेल.
- शाम्पू केल्यानंतर जास्त कंडिशनर लावणं टाळा. यामुळे केस जड होतात आणि तेलकट दिसू लागतात, त्यामुळे ते दररोज धुवावे लागतात.
- केस धुण्यापूर्वी केसांचा गुंता सोडवण्याचा सल्ला दिला जातो. जर केस न विंचरता धुतले तर लवकर तुटतात.