कोणत्याही स्त्रीच्या सौंदर्याला चार चाँद लावण्याचे काम करतात, ते मऊशार, काळेभोर आणि चमकदार केस. म्हणूनच आपण आपल्या चेहऱ्याकडे, चेहऱ्याच्या मेकअपकडे जितके लक्ष देतो, तेवढेच लक्ष केसांकडेही दिले पाहिजे. कारण मेकअप कितीही चांगला केला तरीही काेरडे, रखरखीत किंवा ऑईली आणि चिपचिपीत केस तुमच्या सौंदर्याला मारक ठरू शकतात.
केसांना स्वच्छ करण्यासाठी बहुतांश महिला शाम्पूचा वापर करतात. पण शाम्पू किती आणि कसा वापरावा, किंवा आठवड्यातून किती वेळा शाम्पूचा वापर करावा, आपल्या केसांच्या लांबीनुसार शाम्पू किती प्रमाणात घ्यावा, हेच अनेक जणींना माहित नसते. त्यामुळेच मग त्या शाम्पूचा योग्य परिणाम होत नाही आणि केसांचे सौंदर्य आणि पर्यायाने आराेग्यही बिघडू लागते. म्हणूनच स्वच्छ, चमकदार केसांसाठी पाणी आणि शाम्पूचे योग्य प्रमाण घेऊनच केस धुतले पाहिजेत, असे सौंदर्यतज्ञ सांगतात.
आठवड्यातून दोन वेळा शाम्पू करणे कधीही चांगले. पण शाम्पूचे प्रमाण योग्य असले पाहिजे. ज्या महिलांना वारंवार धुळीत जावे लागते किंवा ज्यांना खूपच घाम येतो, त्यांनी आठवड्यातून तीन वेळा योग्य प्रमाणात शाम्पू केला तरी हरकत नाही. शाम्पू खूप जास्त प्रमाणात घेतला तर त्यामुळे डोक्याच्या त्वचेवरील नैसर्गिक तेलही निघून जाते. डोक्याची त्वचा हळूहळू कोरडी होत जाते आणि कोंड्याचे प्रमाण वाढू लागते. कधीकधी डोक्याला खाज येऊनही खपल्याही पडतात. वारंवार शाम्पू केल्याने केसांचेही प्रचंड नुकसान होते. केस गळण्याचे प्रमाण वाढते. तसेच केसांमध्ये रूक्षपणा, कोरडेपणा येतो आणि ते निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे अतिजास्त प्रमाणात शाम्पूचा वापर करणे कधीही हानिकारकच.
शाम्पू करण्याआधी काही तास किंवा आदल्या दिवशी रात्री अनेक जणी केसांना तेल लावून मालिश करतात. त्यामुळे केसांना लावलेले हे तेल घालवून केस स्वच्छ करण्यासाठी योग्य प्रमाणात शाम्पू लावणे गरजेचे असते. शाम्पू कमी प्रमाणात घेतला गेला तर केसांचे तेलही निघत नाही आणि त्यामुळे केस नीट स्वच्छही होत नाहीत. शिवाय शाम्पू करूनही केस चिपचिपीत ऑईली राहिल्याने होणारा मनस्ताप वेगळाच. म्हणूनच हा मनस्ताप टाळण्यासाठी आणि केसांचे सौंदर्य खूलविण्यासाठी योग्य प्रमाणात शाम्पू करावा.
शॉर्ट ते मध्यम लांबीच्या केसांसाठी साधारण एक टेबल स्पून शाम्पू घ्यावा आणि तो २०० मिलीलीटर म्हणजेच साधारण पाऊण ग्लास पाण्यामध्ये मिसळावा. शाम्पू पाण्यात योग्य प्रमाणात मिसळला आहे की नाही, याकडे आवर्जून लक्ष द्यावे. लांब केसांसाठी शाम्पूचे प्रमाण वाढवावे. दोन टेबल स्पून शाम्पू साधारण ६०० मिलीलीटर पाण्यात मिसळावा आणि त्याने केस स्वच्छ धुवावेत. शाम्पू करताना हलक्या हाताने डोके चोळावे. जोराने रगडून धुतल्यास केस गळू शकतात. याशिवाय केस धुण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करावा. अतिगरम पाण्यानेही केसांचे नुकसान होते.