सोन्याच्या दागिन्यांमध्ये जसा एक वेगळाच थाट असतो, तसाच मोत्यांच्या दागिन्यांमध्ये एक विलक्षण मोहकपणा असतो. अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत कुणाच्याही गळात मोत्याची माळ उठूनच दिसते. एवढेच कशाला हल्ली तर पुरुषही सणवार, लग्न- समारंभ यासारख्या प्रसंगात शेरवाणी घालतात आणि त्यावरुन ठसठशीत दिसणारी टपोऱ्या मोत्यांची लांबसडक माळ घालतात. नथ, बुगड्या, कुड्या, चिंचपेटी, तन्मणी अशा सोन्यात मढवलेल्या अस्सल मोत्यांच्या दागिन्यांची श्रीमंती तर आणखीनच वेगळी. मोत्याच्या दागिन्यांची ही श्रीमंती आणि त्यांची चमक जर वर्षानुवर्षे तशीच टिकवून ठेवायची असेल, तर मोत्याच्या दागिन्यांची विशेष काळजी घेतलीच पाहिजे.
सोन्याचे दागिने आपण चटकन कुठेही काढून ठेवू शकतो. जर सोन्याच्या दागिन्यांची घडणावर अतिशय नाजूक असेल, तर नक्कीच त्यांची काळजी घ्यावी लागते. पण तरीही एखादा डबा, एखादा रूमाल, कपाटाचा एखादा कोपरा किंवा मग आपली पर्स अशा कशातही आपण सोन्याचे दागिने अगदी सहज ठेवू शकतो. अमूक एका गोष्टीजवळ किंवा एखाद्या वस्तूमध्ये सोन्याचे दागिने ठेवले, तर त्यांचे काही नुकसान होते किंवा रंग बदलतो, असे काही नसते. पण अशी सगळी काळजी मात्र मोत्याच्या दागिन्यांबाबत घ्यावी लागते. कारण मोत्याच्या दागिन्यांबाबत कोणताही हलगर्जीपणा केला तरी मोत्याची चमक कमी होऊ शकते.
का घ्यावी लागते मोत्यांची विशेष काळजी?कॅल्शियम कार्बोनेटपासून मोत्यांची घडणावळ केली जाते. हा एक प्रकारचा पॉलिश केलेला सेंद्रिय दगड असतो. त्यामुळे जर मोती काही गोष्टींच्या संपर्कात आले, तर त्याची रिॲक्शन होते आणि मोत्यांची चमक कमी होत जाते. कधी मोती काळे पडत जातात तर कधी मोत्यांच्या टवका उडायला म्हणजेच मोती तुटायला सुरुवात होते. त्यामुळे मोत्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
कशी घ्यावी मोत्याच्या दागिन्यांची काळजी ?- मोत्याच्या दागिन्यांवर कधीही तुमचा परफ्यूम किंवा अत्तर पडू देऊ नका. त्यामुळे परफ्यूम मारून झाल्यावरच मोत्याचे दागिने घाला. यामुळे मोती आणि परफ्यूम यांची रिॲक्शन होऊन मोती काळे पडायला सुरुवात होते.- मोत्याचे दागिने जेव्हा अंगावरून काढाल, तेव्हा सगळ्यात आधी ते एखाद्या मऊ कपड्याने किंवा मग कापसाने व्यवस्थित पुसून घ्या. अनेकदा दागिन्यांवर घाम, धुळ, कुंकू असं बरंच काही लागलेलं असतं. यासारख्या गोष्टींमुळे मोती खराब होऊ शकतो. त्यामुळे अंगावरून उतरवून ठेवल्यानंतर मोत्याचे दागिने स्वच्छ करायला कधीच विसरू नका.
- ब्रिसल्स किंवा बेबी टुथब्रश किंवा मग कलरिंग करण्याचा अतिशय मऊ ब्रश वापरून मोत्याचे दागिने स्वच्छ करता येतात. पण कडक ब्रिसल्स असणारा ब्रश किंवा टुथब्रश मोत्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरू नये. त्यामुळे मोत्यांवर स्क्रॅचेस येऊ शकतात.- बऱ्याचदा असे होते की एकदा का एखादा दागिना कपाटात किंवा मग बँकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवला की तो वर्षभर किंवा अनेक महिने तरी बाहेर निघत नाही. पण असे मोत्याच्या दागिन्यांबाबत होऊ देऊ नका. अस्सल मोती असणारे दागिने महिन्यातून एकदा एखाद्या तासासाठी मोकळे करून म्हणजेच डबीतून कपाटातून बाहेर काढून ठेवावेत. कारण त्यांना थोडी हवा मिळणे गरजेचे आहे. - आंघोळ करताना किंवा पाण्याचा वापर होत असताना मोत्याचे दागिने कधीही घालू नयेत. यामुळे त्यांच्यावर डाग पडू शकतात आणि त्यांची चमक कमी होऊ शकते.
- मोत्याचे दागिने कधीही इतर दागिन्यांसोबत ठेवू नका. मोत्याचे दागिने नेहमी स्वतंत्र डबीतच ठेवावे.- एखाद्या डबीत किंवा पर्समध्ये मोत्याचे दागिने कधीच मोकळे ठेवू नका. सगळ्यात आधी ते एका मलमलच्या कपड्यात किंवा मग कापसामध्ये व्यवस्थित हळूवारपणे गुंडाळा आणि त्यानंतरच ते डबीत ठेवा. - मोत्याचे दागिने ठेवण्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी कधीच वापरू नका. - लिंबाचा रस, फळांचा रस, व्हिनेगर अशा ॲसिडीक वस्तू मोत्यांना कधीच लागू देऊ नका. कारण त्यामुळे मोत्यांचे मोठे नुकसान होते.