भारतीय संस्कृतीत साडीचं एक वेगळंच महत्व आहे. पार्टी, लग्न असो किंवा घरातील कोणतंही फंक्शन. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स महिलांच्या डोक्यात आधीपासूनच असतात. कारण इतर कोणत्याही आऊटफिटमध्ये साडीसारखा क्लासी लूक येत नाही. एकदा एखादी साडी आवडली ती वर्षानुवर्ष चांगली राहावी असं सगळ्याच बायकांना वाटतं. पण काहीवेळा लहान- लहान चुकांमुळे महागातल्या साड्या खराब होतात कधी डाग लागतात तर कधी साडीचा फॉल खराब होतो. साड्या वर्षानुवर्ष कपाटात व्यवस्थित राहण्यासाठी काही टिप्स वापरल्या (Useful tips to take care of expensive sarees ) तर नक्कीच फायदा होईल.
१) प्लास्टिकच्या हँगरचा वापर करा
एकदा कपाटात साडी ठेवल्यानंतर सणवारांना पुन्हा त्या साड्यांना हात लावला जातो. यावेळात साड्यांना गंजाचे डाग लागतात, कधी कधी घडीच्या खुणा साडीवर दिसतात. मग नेसल्यानंतर साडीचा लूक खास दिसत नाही. म्हणून साडी ठेवण्यासाठी प्लास्टिकचा हँगरचा वापर करा. साड्यांना गंज लागण्यापासून वाचवण्यासासाठी प्लास्टिकच्या हँगरर्सचा वापर करा कारण मेटल हँगरचा वापर केल्यास साड्यांना डाग लागू शकतात. अनेकदा धुवूनही हे डाग निघत नाहीत.
२) डांबर गोळ्यांचा वापर
बराच वेळ कपाटात ठेवलेल्या साड्यांना किड लागण्याची भीती असते, किंवा रंग उडतो. त्यासाठी तुम्ही डांबर गोळ्यांचा वापर करू शकता. लक्षात घ्या साडी कापडाच्या किंवा प्लास्टीकच्या पाऊचमध्ये व्यवस्थित घडी करून ठेवाव्यात. डांबर गोळ्या ठेवताना साडीला चिकटणार नाही याची काळजी घ्या अन्यथा साड्यांचा रंग उडू शकतो. याशिवाय कडुंलिबांची पानंही तुम्ही कपाटात ठेवू शकता. ज्यामुळे साड्या वर्षानुवर्ष नवीन दिसतात.
३) सुती कापडात गुंडाळून ठेवा
तुम्ही तुमची महागडी साडी सुती कापडात गुंडाळून ठेवू शकता. या व्यतिरिक्त, आपण मऊ टॉवेल देखील वापरू शकता. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या साड्यांच्या बॅग्स उपलब्ध आहेत, तुम्ही साडी सुद्धा बॅगमध्ये ठेवू शकता. पण हे लक्षात ठेवा की रेशीमाच्या साड्यांसाठी नेहमी सूती पिशव्या निवडा. पॉलिस्टर बॅग फायबर साड्यांसाठी योग्य आहेत. जर तुमच्या साडीमध्ये जड भरतकाम, नेट, लायनिंगचे काम असेल, तर तुम्ही साडी नेसता त्या प्रमाणे मिऱ्या तयार करून फोल्ड करू शकता. त्यामुळे साडीचे धागे खराब होणार नाहीत.
इतर महत्वाच्या टिप्स
१) जर तुमच्या साडीला जेवणाचे, साबणाचे किंवा इतर कशाचेही डाग लागले असतील तर व्यवस्थित धुवूनच मग कपाटात ठेवा.
२) साडी नेसताना जास्त पिनांचा वापर करू नका. कारण त्यामुळे साडी फाटण्याची शक्यता जास्त असते. शक्यतो खालच्या टोकाला जाड गोलाकार असलेल्या टाचण पिनांचा वापर करा. त्यामुळे पिना लावताना किंवा काढताना साडी फाटण्याचा प्रश्नच येत नाही.
३) साडी सेंट, अत्तर अशा सुंगधित द्रव्यांपासून लांब ठेवा. कारण सुगंधित द्रव्यांमुळे साडी काळी पडण्याची शक्यता असते. साड्यांना अशा जागेवर ठेवा जिथे जास्तवेळा कोणाचाही हात लागणार नाही.
४) जमल्यास अधून मधून साड्यांच्या घड्या मोडून थोडावेळ बाहेर ठेवा नंतर पुन्हा घडी घालून कपाटात ठेवा. जास्त उन्हात साडी वाळत घालू नका. कारण यामुळे अनेकदा कापडाचा रंग उडण्याची शक्यता असते.