Join us  

टाचांना पडलेल्या भेगा दुखतात, चारचौघांत लाज आणतात ? हा घ्या त्यावरचा रामबाण इलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 8:16 PM

टाचांवर पडलेल्या भेगा कुणाला दिसू नये, म्हणून अगदी कोणताही ऋतू असला तरी सॉक्स घालून बसण्याची वेळ तुमच्यावर येतेय का, मनासारख्या चपला देखील घालता येत नाहीत ? मग हा प्रॉब्लेम झटपट सोडवायचा असेल तर हा रामबाण इलाज करूनच पहा...

ठळक मुद्देपायांवर कोणतेही घरगुती इलाज करायचे असतील, तर ते रात्रीच्या वेळी झोपण्याच्या आधी करावेत आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेले सॉक्स घालावेत. यामुळे पायांना पुन्हा लगेचच धुळ लागणार नाही.

दिवसभराच्या कामातून स्वत:ची काळजी घ्यायला काही जणींना  अजिबातच वेळ मिळत नाही. कोरोनामुळे आता पार्लरलाही वरचेवर जाणे होत नाही. अशा काळात जो काही थोडा वेळ मिळतो, तो आपण चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी वापरतो आणि पायांकडे मात्र साफ दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक जणींचा चेहरा एकदम नितळ आणि पाय मात्र तेवढेच खडबडीत असेही होते. या टाचांच्या भेगांचा त्रासही खूपच होतो. वारंवार त्याला खाज येते, कधी कधी तर या दुखऱ्या टाचांमधून रक्तही येते आणि खूपच आग होते. या त्रासातून मुक्ती मिळविण्याचा एक मस्त उपाय आहे. बाहेर जाऊन पेडीक्युअर करणे शक्य नसेल तर हे काही साधे सोपे उपाय घरच्याघरी करून पहा आणि तुमच्या टाचांना अगदी मुलायम बनवा.

 

१. अशी घ्या पायांची काळजीएका टबमध्ये गरमपाणी घ्या. त्यात थोडे मीठ टाका आणि अर्धे लिंबू पिळा. २० ते २५ मिनिटे पाय या पाण्यात  ठेवा. यानंतर कोणतेही स्क्रब घ्या आणि तुमच्या पायांना चोळा. तळपायांना स्क्रब करण्यासाठी तुम्ही खराब झालेल्या जुन्या टुथब्रशचा वापरही करू शकता. स्क्रब झाल्यानंतर पाय पुन्हा एकदा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि मॉईश्चरायझर लावून पायाी मालिश करा. 

 

२. कच्चे दूध आणि कडुलिंबाची पानेखरखरीत झालेल्या पायांवर हा इलाज प्रभावी ठरतो. कारण दूध हे नॅचरल मॉईश्चरायझर असते. कच्च्या दुधाने पाय स्वच्छ धुवावेत आणि कडूलिंबाची पाने घालून गरम केलेल्या पाण्यात काही वेळ ठेवावेत. यानंतर थोडेसे रगडले तरी पायांवरचा मळ निघून जाईल. दुधामुळे पायांना ओलावा मिळेल आणि कडूलिंबाच्या पानांमुळे भेगांचे इन्फेक्शन दूर होईल.

 

३. केळी आणि मधपायांना जर खूप जास्त भेगा पडल्या असतील, तर हा इलाज नक्की करून पहा. एका भांड्यात एक केळ कुस्करून टाका आणि त्यामध्ये २ टेबल स्पून मध घाला. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या आणि ते पायांवर चोळून चोळून ५ ते १० मिनिटे मालिश करा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे पाय तसेच ठेवा आणि गरम पाण्याने धुवून टाका. यानंतर पायांना मॉईश्चरायझर लावा. 

 

४. रोज पाय मॉईश्चराईज कराआंघोळ झाल्यानंतर आपण सगळ्यात आधी चेहऱ्याला एखादे क्रिम लावतो. त्यानंतर हात आणि पाय दोघांनाही मॉईश्चरायझर लावतो. पण पावलांना मात्र साफ विसरून जातो. दररोज आंघोळ झाल्यावर पावलांनाही मॉईश्चरायझर लावले, तर पाय कायमच मऊ आणि मुलायम राहतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्समहिला