पदार्थांची चव वाढवण्यासाठी चटपटीत चिंच (tamrind) स्वयंपाकात आवर्जून वापरली जाते. भाज्या, आमटी, चटणी, सूप यामध्ये प्रामुख्यानं चिंच वापरली जाते. चिंच ही फक्त चवीसाठी वापरली जात असली तरी चिंचेचा आहारात समावेश केल्यानं आरोग्यास (tamrind benefits for health) अनेक फायदे होतात. आरोग्य आणि फिटनेसच्या बाबतीत जागरुक असणारे लोक आहारात चिंचेचा समावेश तर करतातच सोबतच चिंचेचं सरबतही (tamrind juice) आवर्जून पितात. चिंचेचं सरबत वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं शिवाय चिंचेच्या सरबतानं त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासही मदत होते. नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी चिंचेचं सरबत पिण्याचा (tamrind juice for skin care) सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात. चिंचेच्या सरबतानं त्वचेचा रंग उजळतो आणि चेहेऱ्यावरील डागही निघून जातात.
Image: Google
चिंचेमध्ये जीवनसत्व, लोह, पोटॅशियम, खनिजं आणि फायबर सारखे महत्वाचे घटक असतात. चिंचेमध्ये त्वचेस फायदेशीर असे जिवाणूविरोधी गुणधर्म आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. या घटकामुळे आजारांशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते. चिंचेत लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होवून त्वचेवर तेज येतं.
चिंचेमध्ये क जीवनसत्व असतं. म्हणूनच चिंचेचा वापर करुन सौंदर्य वाढवता येतं. चेहेऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी, मुरुम- पुटकुळ्या कमी करण्यासाठी, चेहेऱ्यावरील ओपन पोर्सची समस्या घालवण्यासाठी चिंचेचं सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो. चिंच ही थंड प्रकृतीची असल्यानं चिंचेचं सरबत हे थोड्या प्रमाणात म्हणजे 100 मिलीपेक्षा जास्त पिऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. चिंचेचं एवढंसं सरबतही सौंदर्य वाढवण्यास फायदेशीर असतं. चिंचेचं सरबत प्यायल्यानं त्वचेचं पोषण होतं. यामुळे त्वचेशी निगडित अनेक समस्या सहज दूर होतात.
Image: Google
प्या नाहीतर चेहेऱ्याला लावा चिंचेचं सरबत
जर चिंचेच्या सरबताची चव आवडत नसली तर सरबत पिण्याऐवजी चेहेऱ्याला लावलं तरी फायदेशीर ठरतं. चिंचेच्या सरबताचा उपयोग चेहेऱ्याला लावल्या जाणाऱ्या फेसपॅकमध्ये किंवा स्क्रबमध्येही करता येतो .
Image: Google
चिंचेचं सरबत कसं करावं?
आरोग्यास आणि सौंदर्यास फायदेशीर असं चिंचेचं सरबत करण्यासाठी चिंच, मध, थोडं पाणी आणि थोडा बर्फ लागतो. चिंचेचं सरबत तयार करताना सर्वात आधी चिंच चांगली धुवून घ्यावी. चिंचेतल्या बिया काढून चिंच पाण्यात चांगली उकळून घ्यावी. चिंच उकळल्यानंतर पाणी गाळून घ्यावं. चिंचेच्या पाण्यात मध घालावं. ते चांगलं मिसळून घेतल्यावर त्यात थोडा बर्फ घालावा. सरबतात गोडवा हवा असल्यास मधाऐवजी थोडा सेंद्रिय गूळ वापरला तरी चालतो. चिंचेचं सरबत जर चेहेऱ्यास लावायचं असेल तर त्यात बर्फ घालू नये. गूळाऐवजी मधच वापरावं.