Skin Care: त्वचेसाठी मुलतानी मातीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो. मुलतानी मातीच्या फेस पॅकनं त्वचेवर ग्लो तर येतोच, सोबतच चेहऱ्यावरील डागही दूर होतात. मुलतानी माती चेहऱ्यावर योग्य पद्धतीनं लावली तर चेहऱ्यावरील मळ-माती आणि स्पॉट्स कमी होऊ लागतात. महत्वाची बाब म्हणजे मुलतानी माती कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. अशात मुलतानी माती चेहऱ्यावर कशा पद्धतीनं लावावी हे जाणून घेऊ.
मुलतानी माती आणि चंदन पावडर
हा फेसपॅक बनवण्यासाठी समान प्रमाणात मुलतानी माती आणि चंदन पावडर मिक्स करा. यात पाणी किंवा गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. हे पेस्ट चेहऱ्या वर १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. डाग कमी करण्यासाठी हा फेसपॅक खूप फायदेशीर ठरतो.
मुलतानी माती आणि मध
मधात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात आणि त्वचा यानं मॉइश्चराइज होते. मध आणि मुलतानी मातीची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर २० मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्यानं धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा हा फेसपॅक लावल्यासही डाग कमी होतील.
मुलतानी माती आणि गुलाबजल
हा फेसपॅक बनवण्यासाठी गरजेनुसार मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्यानं धुवून घ्या. यानं चेहऱ्यावर ग्लो येईल आणि त्वचा मुलायम होईल. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावू शकता.
मुलतानी माती आणि हळद
हळदीमध्ये अनेक औषधी गुण असतात. ज्यामुळे त्वचेला खूप फायदे मिळतात. अशात २ चमचे मुलतानी मातीमध्ये अर्धा चमचा हळद आणि पाणी टाकून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवून घ्या. यानं डाग कमी होतील आणि चेहऱ्याचा रंग उजळेल.
मुलतानी माती आणि दूध
कच्च दूध मुलतानी मातीमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. या फेसपॅकमध्ये थोडी हळद टाकू शकता. मुलतानी मातीचा हा फेसपॅक लावल्यास त्वचा फ्रेश होईल. तसेच डाग कमी होतील आणि त्वचा मुलायमही होईल.