केसांचे चांगले पोषण व्हावे, वाढ व्हावी यासाठी आपण केसांना नियमितपणे तेलाने मसाज करतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी आपण केसांना तेल लावतोच लावतो. बहुंताश वेळा आपण घरात सगळे जण जे तेल वापरतात तेच वापरतो. यामध्ये खोबरेल तेल, बदाम तेल यांचा सामान्यपणे समावेश असतो. पण आपण शाम्पू वापरताना ज्याप्रमाणे आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन त्याची निवड करतो. त्याचप्रमाणे तेलाची निवड करतानाही आपल्या आपल्या केसांचा पोत लक्षात घ्यायला हवा. किरण कुकरेजा या आहारतज्ज्ञ असून त्यांनी नुकत्याच आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबतच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्या नेमकं काय सांगतात पाहूया (How To choose Perfect Hair Oil For Your Hair Type)...
१. रुक्ष, फाटे फुटलेल्या केसांसाठी
तुमचे केस खूपच खराब झाले असतील, कोरडे असतील किंवा त्याला जास्त प्रमाणात फाटे फुटले असतील तर खोबरेल तेल, जोजोबा ऑईल किंवा अर्गन ऑईल हे उत्तम पर्याय ठरु शकतात.
२. पांढऱ्या केसांसाठी
तुमचे केस कमी वयात पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर त्यामागे असंख्य कारणं असतात. अशावेळी ऑर्गेनिक तिळाचे तेल लावणे हा चांगला पर्याय असतो. तिळाचे तेल बाजारात सहज उपलब्ध असते. मात्र त्याची गुणवत्ता तपासून घ्यायला हवी.
३. कुरळ्या केसांसाठी
तुमचे केस खूप कुरळे आणि भुरकट किंवा फुगणारे असतील तर त्याला पोषण मिळण्यासाठी अर्गन ऑईल हा चांगला पर्याय असतो. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
४. केसांच्या वाढीसाठी
आपले केस लांबसडक असावेत अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र काही वेळा काही कारणांनी केसांची वाढ खुंटते आणि केस अजिबात वाढत नाहीत. पण केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी एरंडेल तेल लावणे फायदेशीर ठरते. वाढ खुंटली असेल तर ती पुन्हा पूर्वपदावर येण्यास या तेलाचा चांगला उपयोग होतो.
५. कोंडा आणि खाज येत असेल तर
डोक्यात खूप कोंडा असेल आणि खाज येत असेल तर नेहमीचे तेल वापरुन चालत नाही. तर अशावेळी केसांना टी ट्री ऑईल किंवा कडुलिंबाचे तेल लावायला हवे. यामुळे कोंडा आणि पर्यायाने खाज कमी होण्यास मदत होते.