Join us  

त्वचा खूप तेलकट आहे? त्यासाठी कोणतं सनस्क्रीन वापरणं योग्य? ते कसं निवडायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 6:16 PM

How To Choose Perfect Sunscreen For Oily Skin : तेलकट त्वचेसाठी सनस्क्रीन निवडताना लक्षात ठेवा ३ गोष्टी ; उन्हात फिरुनही त्वचा राहील एकदम मुलायम

माझी त्वचा खूप तेलकट आहे? सनस्क्रीन लावलं की अजून तेलकट होते, चिपचिपे दिसते? सनस्क्रीन तर लावायला हवं पण तेलकट त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन वापरणं योग्य ठरेल?

उन्हात बाहेर पडलं की त्वचा लाल होते, रॅश येतात, खाज येते अशा सगळ्या समस्या होतात. मात्र तरीही आपल्याला योग्य ती माहिती नसल्याने आपण घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावत नाही. अभिनेत्रींची त्वचा कायम इतकी सुंदर आणि ग्लोईंग कशी असते असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र त्या आपल्या त्वचेची घेत असलेली काळजी आणि स्कीन केअर रुटीन यामुळे त्यांची त्वचा कायम चांगली राहण्यास मदत होते. व्यायाम, आहार आणि ताणतणाव यांचाही त्वचेवर परीणाम होत असतो पण त्याचबरोबरीने बाजारात उपलब्ध असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्याचा त्वचेचा पोत चांगला राहण्यास त्याची मदत होते. सनस्क्रीन हा त्यातील अतिशय महत्त्वाचा घटक मात्र आपण त्याकडे तितक्या गांभिर्याने पाहत नाही (How To Choose Perfect Sunscreen For Oliy Skin) .  

घराबाहेर पडताना किंवा अगदी घरातही नियमितपणे सनस्क्रीन लोशन लावायला हवे असा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देतात, मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या त्वचेला नेमके कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन लोशन सूट होईल हे अनेकदा आपल्याला समजत नाही. सनस्क्रीन लावल्यावर आपली त्वचा पांढरट दिसेल का, त्याचे चेहऱ्यावर आणि हातावर विचित्र डाग दिसतील का असे प्रश्नही काही वेळा आपल्याला पडतात. या प्रश्नांची योग्य ती उत्तरे न मिळाल्याने आणि नेमकं कोणतं सनस्क्रीन वापरावं याबद्दल माहिती नसल्याने आपण ते विकत घेणे आणि लावणे टाळतो. मात्र आपल्या त्वचेचा पोत म्हणजेच कोरडेपणा, तेलकटपणा लक्षात घेऊन सनस्क्रीनची निवड करायला हवी. आज मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या असून चांगला सन प्रोटेक्शन फॅक्टर्स (एसपीएफ) कोणत्या सनस्क्रीनचा आहे हे समजून घेणे गरजेचे असते. तसेच तेलकट त्वचेला कोणते सनस्क्रीन चांगले याबाबत माहिती घेऊया.  

सनस्क्रीन निवडताना काय काळजी घ्याल?

सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला माहिती असलेल्या आणि बाजारात बराच काळ असणाऱ्या ब्रँडचे सनस्क्रीन वापरा. यामध्ये कोणत्या अभिनेत्री त्याची जाहिरात करतात म्हणून किंवा माहित नसलेल्या ब्रँडचे सनस्क्रीन घेणे शक्यतो टाळा. जे जास्तीत जास्त वेळ आपल्या त्वचेचं सूर्यप्रकाशापासून संरक्षण करेल असं सनस्क्रीन घेणं केव्हाही जास्त चांगलं. आपण घरात किती बसतो आणि घराबाहेर किती फिरतो यानुसार सनस्क्रीनची निवड करायला हवी.

त्वचा तेलकट असेल तर सनस्क्रीन निवडताना काय पाहावं?

साधारणपणे त्वचा तेलकट असेल तर त्वचेवर आधीच एक तेलकट थर आलेला असतो. ज्यामुळे त्वचा काळपट दिसते. त्वचेची जळजळ टाळण्यासाठी असं सनस्क्रीन निवडा ज्यात पॅकेजवर "नो सेबम" (नॉन-ग्रीसी) किंवा "ऑइल फ्री" (तेलमुक्त) शब्द असतील किंवा सनस्क्रीन जेल, पाणी किंवा स्प्रे फॉर्ममध्ये असेल तर आणखी चांगले. यामुळे त्वचा आधीच तेलकट असताना आणखी तेलकट होणार नाही. 

एसपीएफबाबत काय काळजी घ्याल?

तुम्ही घरात बसणार असाल तर तुम्हाला एसपीएफ २० किंवा ३० असलेले सनस्क्रीन लावणे ठिक आहे. पण तुम्ही जास्त काळ बाहेर उन्हात फिरणार असाल तर तुम्हाला किमान ४० ते ५० एसपीएफ असलेले सनस्क्रीन लोशन लावायला हवे. सनस्क्रीनचा एसपीएफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) हे त्वचेचे सूर्यप्रकाशापासून किती चांगले संरक्षण करते याचे मोजमाप आहे. साधारणपणे २ ते ३ तासाने आपण चेहऱ्याला किंवा हाताला, मानेला लावलेल्या सनस्क्रीनची मात्रा कमी होते. अशावेळी दर ठराविक काळाने सनस्क्रीन लोशन लावणे अतिशय आवश्यक आहे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स