मॉईश्चरायजर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात? कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणतं मॉईश्चरायजर चांगलं?
मॉईश्चरायजर हा आपल्या स्कीन केअर रुटीनमधील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आंघोळ झाल्यावर, मेकअप करण्याच्या आधी, रात्री झोपताना अशा बहुतांश वेळा आपण चेहऱ्याला आणि हातांनाही मॉईश्चरायजर लावतो. साधारणपणे आपण बाजारात मिळणाऱ्या एखाद्या चांगल्या ब्रँडचे मॉईश्चरायजर खरेदी करतो. मात्र ते आपल्या त्वचेला सूट होणारे आहे की नाही हे आपल्याला माहित नसते. जाहिरातीत पाहून, मित्रमैत्रीणींकडून ऐकून किंवा फारतर ऑनलाईन रिव्ह्यू वाचून आपण आपल्या स्कीन केअर प्रॉडक्टची निवड करतो. मात्र असे न करता आपल्या गरजेनुसार, आपल्या त्वचेनुसार आणि आवडीनुसार परफेक्ट असे मॉईश्चरायजर कसे निवडायचे हे आपण पाहणार आहोत (How To Choose Perfect Moisturizer).
१. मॉईश्चरायजरची निवड करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती?
आपल्या त्वचेचा पोत कसा आहे हे लक्षात घ्यायला हवे, त्वचा तेलकट, कोरडी की सामान्य आहे हे पाहून त्यानुसार निवड करायला हवी. तुम्हाला सतत मुरूम येतात, त्वचेवर रॅशेस येतात याचाही विचार करायला हवा. कारण त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार मॉईश्चरायजरचे प्रकार असतात.
२. मॉईश्चरायजरच्या टेक्शरबाबत काय काळजी घ्यायला हवी?
सामान्य त्वचेला हलके जास्त तेलकट नसलेले मॉईश्चरायजर चालते. तर कोरड्या त्वचेला थोडे जड आणि क्रिमी बेस असलेले मॉईश्चरायजर लागते, ज्यामुळे त्वचेतील ओलावा दिर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे आपण घेतलेल्या उत्पादनाचा केवळ पोत नाही तर ते त्वचेवर लावल्यानंतर कसे दिसते याकडेही लक्ष द्यायला हवे.
३. मॉईश्चरायजरला वास असावा की नाही? किती, कसा?
मॉईश्चरायजर आपण चेहऱ्याला लावतो त्यामुळे तो आपल्या नाकाच्या जवळ असतो. त्यामुळे चांगला वास असलेले मॉईश्चरायजर घेणे केव्हाही चांगले त्यामुळे अशा दुकानात घ्यायला हवे ज्याठिकाणी आपण विविध प्रकार ट्राय करु शकतो किंवा किमान उघडून वास तरी घेऊ शकतो. मात्र त्वचा खूप संवेदनशील आणि मुरुमे येणारी असेल तर सुगंध किंवा परफ्यूम असलेले मॉईश्चरायजर टाळलेले केव्हाही चांगले.
४. मॉईश्चरायजरमध्ये एसपीएफ असते का?
सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी नियमितपणे सनस्क्रीन लोशन लावायला हवे हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही या गोष्टीकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. मात्र किमान मॉईश्चरायजर तरी लावायलाच हवे. एसपीएफ १५ किंवा त्याहून जास्त एसपीएफ असलेले मॉईश्चरायजरची निवड करायला हवी.