Join us  

चेहेऱ्याची काळजी घेता, पण पायाची नखं घाणेरडी? पायाची नखं स्वच्छ -सुंदर ठेवण्याचे 5 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 4:21 PM

जितकी काळजी चेहेऱ्याच्या सौंदर्याची घेतली जाते तितकीच पायाच्या स्वच्छतेचीही घ्यावी. पायाची काळजी घेताना नखं स्वच्छ (nail cleaning) ठेवणं आवश्यक. पायाची नखं आतून बाहेरुन स्वच्छ करण्याची (method of cleaning toe and finger nails) विशिष्ट पध्दत आहे, ती समजून घ्यायला हवी. 

ठळक मुद्देपायची नखं स्वच्छ करताना मेडिकेटेड साबण किंवा ॲण्टिसेप्टिक लोशन वापरल्यास जास्त फायदा होतो.पायाची नखं वरुन स्वच्छ करणं सोपं पण आतून् स्वच्छ करताना विशेष काळजी घ्यावी लागते. पायांच्या नखांनाही माॅश्चरायझरची आवश्यकता असते. 

चेहेऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी नाना उपाय केले जातात. पण चेहेऱ्याची काळजी घेता घेता पायाच्या नखांकडे (toe and finger nails cleanness)  मात्र सामान्यत: दुर्लक्ष होतं. त्याचे परिणाम पाय अस्वच्छ दिसतात. नखं घाणेरडी होतात. पायाची नखं स्वच्छ करण्याची विशिष्ट आणि सोपी पध्दत (method of toe and finger nail cleaning)  अरोमा थेरेपिस्ट आणि काॅस्मेटोलाॅजिस्ट पूजा नागदेव यांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितलेल्या पध्दतीनं पायाच्या नखांची काळजी घेतल्यास  (what to do for nail cleaning) नखं स्वच्छ होतात, सुंदर दिसतात आणि नखांमध्ये घाण साचून संसर्ग होण्याचा धोकाही टळतो.

Image: Google

पायाची नखं कशी स्वच्छ ठेवायची?

1. सर्वात आधी पायाची नखं साबण लावून स्वच्छ धुवावीत. यामुळे नखांवरील घाण आणि माती निघून जाते. यासाठी मेडिकेटेड साबण किंवा ॲण्टिसेप्टिक लिक्विड वापरल्यास जास्त चांगलं. 

2. नखं स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ कपड्यानं कोरडी करावीत. नंतर पसरट आणि खोलगट भांड्यात कोमट पाणी घ्यावं. त्या पाण्यात पाय बुडवून् बसावं. 10- 15 मिनिटानंतर पाय पाण्यातून बाहेर काढून प्युमिक स्टोननं नखं हळूवार घासावीत. नखातून घाण काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑरेंज स्टिकनं मऊ झालेल्या नखातली घाण काढावी. नेलकटरमधील क्य्युटिकल क्लीनरनं नखं स्वच्छ करुन पायांच्या बोटांना पेट्रोलियम जेली लावावी. 

3. नखं ब्रशनं किंवा प्युमिक स्टोननं वरुन घासणं सोपं आहे पण नखांची आतून स्वच्छता केली तरच ती स्वच्छ आणि निरोगी होतात. नखांची आतून स्वच्छता करण्यासाठी पाय कोमट पाण्यात बुडवून बाहेर काढल्यानंतर रुमालानं पाय पुसून घ्यावेत. नंतर नखं आधी कापवेत. आणि मग ऑरेंज स्टिकनं नखं आतून स्वच्छ करावीत. अशा पध्दतीनं नखं स्वच्छ करताना ऑरेंज स्टिकला लागलेली घाण कापसाला पुसत राहावी.

Image: Google

4. नखं स्वच्छ करण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर करणार असाल त्या गोष्टी आधी नीट उकळून जंतूविरहित कराव्यात. कारण ही साधनं केवळ नखांची वरुन स्वच्छता करण्यासाठीच नाही तर आतून स्वच्छता करण्यासाठी वापरतो. ती नीट जंतूविरहित केलेली असल्यास जंतूसंसर्गाचा धोका राहात नाही. 

5. पायांच्या नखांची काळजी घेण्याची सोपी पध्दत म्हणजे नखं नेहेमी कापलेली हवी. माॅश्चरायझर लावताना केवळ पायाला, पायाच्या बोटांनाच नाही तर नखांनाही लावावं. नखांना विटॅमिन ई ऑइल लावल्यास नखं स्वच्छ आणि मऊ राहातात.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी