केस गळणे ही सध्या एक मोठी समस्या झाली आहे. प्रदूषणामुळे, कधी आपण केसांसाठी वापरत असलेल्या विविध रासायनिक उत्पादनांमुळे किंवा आणखी कशामुळे केस गळण्याचे प्रमाण (How To Control Hair Fall) वाढले आहे. या केस गळण्यामुळे केस केवळ पातळच होत नाहीत तर पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही टकलेपणाची समस्या वाढत असल्याचे दिसते. ताण हे केस गळण्याचे किंवा तुटण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण सांगितले जात असून त्याशिवायही इतर काही कारणांनी केस गळण्याची समस्या उद्भवते. पाहूयात केसगळती कमी व्हावी यासाठ करता येणारे सोपे उपाय...
१. अश्वगंधा
अश्वगंधा ही आयुर्वेदातील एक अतिशय महत्त्वाची वनस्पती असून केसांसाठीही तिचा अतिशय चांगला उपयोग होतो. १ चमचा अश्वगंधा पावडरमध्ये २ चमचे नारळाचे तेल घालून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट हेअरमास्कप्रमाणे केसांना लावावी. साधारणपणे ३० मिनीटे हा मास्क असाच ठेवावा. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस धुवावेत. आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास केसगळती कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
२. एरंडेल तेलाने मालिश करा
महिलांनी आपल्या केसांची योग्य निगा राखण्यासाठी केसांना तेलाने मालिश करायला हवी. एरंडेल तेल केसांसाठी अतिशय चांगले असते असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या तेलामुळे केवळ केसांनाच मसाज होत नाही तर डोक्याच्या त्वचेचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा केसांना एरंडेल तेलाने मसाज करा. यामुळे केसगळती कमी होऊन केस वाढण्यास आणि दाट होण्यास निश्चितच मदत होईल.
३. तेल लावायच्या आधी हे करा
अनेकदा आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना तेल लावतो तरीही आपले केस खूप गळतात. याचे कारण म्हणजे केसांच्या मूळाशी चिकटलेली घाण तशीच राहते आणि ती मूळांच्या आत जाऊन केसगळती सुरू होते. पण केसांना तेल लावायच्या आधी केस नुसत्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. मग तेल लावून शाम्पूने पुन्हा धुवावेत. यामुळे केसांची मूळे तेल लावताना स्वच्छ राहतात आणि घाण मूळांमध्ये मुरत नाही. तेल लावताना मूळे स्वच्छ राहिल्याने केसगळती कमी होण्यास मदत होते.