विकेंड म्हणजे आठवडाभराचा शीण, थकवा दूर करण्याचा दिवस. या दिवशी आपण कितीही कामं असली तरी थोडा वेळ ठरवून आराम करतो. घरातल्या जबाबदाऱ्या, आठवड्याभराची तयारी असं सगळं असलं तरी स्वत:साठी थोडा तरी वेळ विकेंडला द्यायलाच हवा. बाकीच्या धावपळीत आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळ नाही मिळाला तरी घरीच अगदी १५ मिनीटांत आपण पार्लरसारखे परफेक्ट फेशियल करु शकतो. एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल किंवा अगदी नेहमीचे ऑफीस रुटीन असेल तरी स्वत:चा चेहरा स्वत:ला फ्रेश वाटण्यासाठी आणि रापलेला चेहरा स्वच्छ होण्यासाठी हे फेशियल करणे गरजेचे आहे. ३ सोप्या स्टेप्समध्ये सहज करता येणारे हे फेशियल कसे करायचे पाहूया (How To Do 3 Step D Tan Facial at Home)..
१. आईस मसाज
सगळ्यात आधी चेहऱ्याला बर्फाने मसाज करावा. यामुळे त्वचेला घट्टपणा येण्यास मदत होते. काही कारणांनी त्वचा सैल पडली असेल तर याचा चांगला फायदा होतो. तसेच त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास याची चांगली मदत होते. घामाने किंवा अन्य काही कारणांनी त्वचेची रंध्रे उघडी झाली असल्यास ती बंद होण्यासही बर्फाच्या मसाजचा चांगला फायदा होतो. आपल्या घरातील फ्रिजमध्ये बर्फ अगदी सहज उपलब्ध असतो. त्याचाच वापर करुन हा मसाज केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
२. डी टॅन मसाज
यानंतर चेहऱ्याला डी ट्यानिंगचा पॅक लावणे अतिशय महत्त्वाचे असते. उन्हामुळे आणि इतर सौंदर्यप्रसाधनांमुळे चेहरा काळवंडला असेल तर या पॅकचा फायदा होतो. त्यासाठी बेसन पीठ, कोरफडीचा गर, कॉफी आणि दही चांगले एकत्र करायचे. हा पॅक ब्रशने चेहऱ्याला लावायचा. १० मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर ठेवून त्यानंतर सध्या पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. यामुळे त्वचेचा काळेपणा तर दूर होतोच पण चेहऱ्याला ग्लो येण्यासही मदत होते.
३. फेस पॅक
यानंतर १ चमचा मध आणि १ चमचा कोरफडीचा गर घेऊन ते चांगले एकत्र करावे आणि चेहऱ्याला एकसारखे लावावे. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा चमकदार दिसण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा किंवा दिवसातून एकदा हा पॅक लावल्यास चेहऱ्यावर त्याचे इफेक्ट दिसून येतात.