सणावाराचे दिवस म्हणजे वेळ कमी आणि कामं जास्त. सगळी कामं आटोपून स्वत:कडे बघितलं की चेहेऱ्यावरचं सगळं तेजच हरपलेलं दिसतं. मग कितीही चांगले कपडे, दागिने घालून तयार झालं तरी चेहेऱ्यावर हवी असलेली चमक काही दिसत नाही. पार्लरला जायला वेळ नाही म्हणून चेहेरा चांगला दिसत नाही असं कारण आपणच आपल्याला देऊ लागतो. पण चेहेऱ्यावर ग्लो हवा असल्यास (instant glow on skin) त्यासाठी ब्यूटी पार्लरलाच जायला हवं असं नाही. कमी वेळात, घरच्याघरी चेहेऱ्याची योग्य काळजी घेऊन सणवाराला लागणारं चेहेऱ्यावरचं तेज सहज (home remedy for skin care) आणता येतं. घरच्याघरी त्वचा जपणारे , चेहेऱ्यावरचं सौंदर्य खुलवणारे, नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करुन देणारे अनेक प्रकारचे फेशियल (home facial) करता येतात. त्यात त्वचा जपणारं आणि त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणणारं स्टीम फेशियल (steam facial) करावं. स्टीम फेशियलनं चेहेऱ्यावर फक्त ग्लोच येतो असं नाही तर इतर अनेक (benefits of steam facial) फायदेही होतात. घरच्याघरी स्टीम फेशियल करणं अवघड नाही. पध्दत समजून घेतली तर घाईच्या वेळेतही (how to do steam facial at home) ते सहज करता येतं.
Image: Google
कसं करायचं स्टीम फेशियल?
1. स्टीम फेशियल करण्याआधी चेहेरा स्वच्छ करणं आवश्यक आहे. कारण स्टीम फेशियल करताना चेहेऱ्याच्या त्वचेवरची रंध्रं उघडतात. जर त्वचा संवेदनशील असेल, कोरडी असेल तर चेहेरा केवळ पाण्यानं स्वच्छ धुवावा. त्यासाठी फेसवाॅश वगैरे वापरुन त्वचा एक्सफोलिएट करण्याची गरज नसते.
2. वाफ घेण्यासाठी पाणी गरम करावं. गरम पाण्यात हर्ब्स इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाकावेत. किंवा लेमनग्रास किंवा सॅण्डलवूड ऑइल वापरावं. यामुळे वाफ घेतांना छान सुगंध येतो. घरात इसेन्शियल ऑइल नसल्यास ग्रीन टी बॅग वापरावी.
3. वाफ घेताना गरम पाण्याचं भांडं टेबल किंवा ओट्यावर ठेवावं. चेहेरा गरम पाण्याक्या भांड्यावर धरावा. डोक्यावरुन रुमाल ओढून घ्यावा. वाफ घेताना डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्यावा. गरम पाण्याच्या वाफेमुळे चेहेऱ्यावरची रंध्रं उघडली जातात. अशा पध्दतीनं 10 मिनिटं चेहेऱ्यावर वाफ घ्यावी.
4. वाफ घेऊन झाल्यवर चेहेऱ्याला लेप लावावा. यासाठी क्ले मास्कचा वापर करावा. क्ले मास्कसाठी व्हाइट क्ले/ ग्रीन क्ले/ पिंक क्ले/ बेंटोनाइट क्ले किंवा मुल्तानी माती वापरावी. क्लेमध्ये पाणी घालून दाटसर लेप तयार करावा. हा लेप संपूर्ण चेहेऱ्यावर लावावा. लेप लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून् घ्यावा.
5. नंतर चेहेऱ्याला टोनर लावावं. टोनर म्हणून थोडा लिंबाचा रस लावला तरी चालतो. टोनर लावण्यासाठी कापसाच्या बोळ्याचा वापर करावा.
6. टोनर लावल्यानंतर सर्वात शेवटी त्वचेला माॅश्चरायझर लावावं. वाफेमुळे त्वचा कोरडी पडते. माॅश्चरायझर लावल्यानं चेहेऱ्यातील आर्द्रता जपली जाते. जर माॅश्चरायझर नसेल तर चेहेऱ्याला खोबऱ्याच्या तेलानं हलका मसाज केला तरी चालतो.
Image: Google
स्टीम फेशियल करताना...
1. स्टीम फेशियल करताना चेहेऱ्याला सोसवेल इतकं पाणी गरम करावं. वाफ घेतांना चेहेरा गरम पाण्याच्या अगदी जवळ नेऊ नये.
2. 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ वाफ घेऊ नये. जास्त वेळ वाफ घेतल्यास गरम वाफेनं चेहेऱ्यावर सूज येवू शकते.
3. वाफ घेतल्यानंतर त्वचेवर टोनर, माॅश्चरायझर वापरणं आवश्यक आहे.
Image: Google
स्टीम फेशियलचे फायदे काय?
1. स्टीम फेशियल केल्यानं त्वचेचा पोत मऊ होतो. त्यामुळे चेहेऱ्यावरील मृत त्वचा, धूळ, जिवाणू हे घटक दूर होण्यास मदत होते. त्वचेचा पृष्ठभाग स्वच्छ झाला की त्वचा श्वास घेऊ लागते.
2. वाफ घेताना चेहेऱ्याला उष्णता जाणवते. त्यातून आपल्या मेंदूला चेहेऱ्याकडील रक्तप्रवाह वाढवण्याचा संदेश मिळतो. स्टीम फेशियलनं चेहेऱ्यावरील रक्तप्रवाह वाढतो, चेहेऱ्याला पोषक घटक आणि ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे चेहेऱ्यावर चमक येते.
3. वाफ घेताना चेहेऱ्याला घाम येतो. त्यामुळे त्वचेवरची रंध्रं उघडतात. रंध्रांमध्ये अडकलेली घाण, मृत पेशी आणि विषारी घटक बाहेर पडतात.
4. वाफ घेतल्यानं चेहेऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाॅइटहेड्स मऊ होतात आणि ते नंतर चेहेऱ्याला हलकं स्क्रब केलं तरी निघून जातात. चेहेऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स असतील तर वाफ घेतल्यानंतर चेहेऱ्याला लेप लावण्याआधी काॅफी पावडर आणि थोडी दही वापरुन त्यानं चेहेऱ्याला हलकं स्क्रब करावं.