Join us  

पार्लरमध्ये जायला वेळ नाही? दही आणि काॅफीनं करा घरच्याघरी मेनिक्युअर, हात होतील मऊ मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 5:34 PM

कामांच्या गर्दीत हाताच्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला फुरसतच नाही. पार्लरमध्ये जावून मेनिक्युअर (manicure) करायला वेळ कुठेय? मग घरच्याघरी मेनिक्युअर (manicure at home) करा. त्यासाठी लागतात फक्त 2 गोष्टी आणि 25 मिनिटं. 

ठळक मुद्देहाताची त्वचा मऊ करण्यासाठी नैसर्गिक माॅश्चरायझर असलेल्या दह्याचा उपयोग होतो.काॅफीमुळे हाताची त्वचा स्वच्छ होते. दही काॅफीच्या मिश्रणानं मेनिक्युअर केल्यानं उन्हापासून हाताच्या त्वचेचं संरक्षण होतं. 

गौरी गणपतीच्या सणाला घर सजलं, सज्ज झालं पण तुमचं काय? हातात वेळ कमी असल्यानं अनेकजणी पार्लरमध्ये जावून बेसिक क्लीनअप करुन येतात. पण जरा निवांत बसून मेनिक्युअर पेडिक्युअर करायला वेळच नसतो. अशा वेळेस घरातले उपाय कामी येतात. वेळ नव्हता म्हणून मेनिक्युअर (manicure)  करता आलं नाही अशी खंत करत कामांमुळे खडबडीत हात एकमेकांवर घासत राहाण्याची गरज नाही. सौंदर्य तज्ज्ञ रेणू यांनी  दही आणि काॅफी (manicure with coffee and curd)  या दोन गोष्टींनी पार्लरसारखं मेनिक्युअर घरच्याघरी (manicure at home)  करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. 

Image: Google

मेनिक्युअरसाठी दही आणि काॅफी का?

1. घरच्याघरी मेनिक्युअर करण्यासाठी दही आणि काॅफी हे दोन घटक परिणामकारक ठरतात. दही हे त्वचेसाठी नैसर्गिक माॅश्चरायझरचं काम् करतं. दह्यात असलेले प्रथिनं, झिंक, कॅल्शियम हे घटक हातांच पोषण करतात. दह्यामुळे नखांमध्ये साचलेली घाण सहज निघून जावून नखं स्वच्छ होतात. 

2. काॅफी पावडरमुळे हाताची त्वचा खोलवर स्वच्छ होते. हाताच्या त्वचेवर साचून राहिलेली घाण, हातावरील मृत त्वचा निघून जाते. तसेच मेनिक्युअर करताना काॅफी वापरल्यास उन्हापासून हाताच्या त्वचेचं संरक्षण होतं. 

Image: Google

दही काॅफीनं घरच्याघरी मेनिक्युअर

घरच्याघरी दही काॅफीनं मेनिक्युअर करताना सर्वात आधी हात पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यावेत आणि रुमालानं कोरडे करुन घ्यावेत. एका  वाटीत आपल्या आवश्यकतेनुसार दही आणि काॅफी घ्यावी. या दोन्ही गोष्टी एकत्र करुन घ्याव्यात.  यात 5 ते 6 लिंबाच्या रसाचे थेंब घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावं.  हे मिश्रण हाताला लावावं. 20 ते 25 मिनिटं ते हातावर ठेवावं. नंतर कापसाच्या बोळ्यानं हाताला लावलेला लेप स्वच्छ पुसून काढावा. हात पाण्यानं स्वच्छ धुवावेत. हाताला माॅश्चरायझर लावावं.

Image: Google

या उपायानं काही वेळात खडबडीत झालेले हात मऊ होतात. हातावर साचलेला मळ निघून जावून हाताची त्वचा उजळ होण्यास मदत होते. घरच्याघरी हा उपाय आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा करता येतो. हात कायम मऊ मुलायम ठेवण्यासाठी, हाताची त्वचा जपण्यासाठी , उजळ करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा दही काॅफीच्या सहाय्यानं घरच्याघरी मेनिक्युअर करण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ रेणू देतात. घरच्याघरी मेनिक्युअर करण्याचा सोपा, स्वस्त आणि परिणामकारक उपाय यापेक्षा दुसरा कोणता असू शकेल?

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी