मकर संक्रांत म्हणजे महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांपैकी एक खास सण. संक्रमाणाचा काळ, किंवा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचे वेध यामुळे या सणाला खास महत्त्व आहे. थंडीच्या दिवसांत येत असल्याने या दिवशी खास काळे कपडे घातले जातात. हळदी कुकंवाला एकमेकींकडे जाण्यासाठी, लहान मुलांचं बोरन्हाण म्हणून किंवा कोणाचा पहिला संक्रांत सण म्हणून आपण छान आवरतो. रथसप्तमीपर्यंत आपण एकमेकांकडे तीळगूळ द्यायला किंवा हळदी कुंकवाला, वाण द्यायला जातो. अशावेळी झटपट आणि तरीही छान आवरण्यासाठी काही सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत (How To Get Ready For Makar Sankranti Make up Tips).
१. काळ्या रंगाचे कपडे हे सगळ्यांवर छानच दिसतात त्यामुळे काळे कपडे घातल्यावर खूप जास्त मेकअप करणे, दागिने घालणे शक्यतो टाळावे. नाहीतर आपला लूक जास्त बटबटीत होतो मग आपण सोबर दिसण्याऐवजी सगळ्यांपेक्षा वेगळे आणि जास्त भडक वाटते. म्हणून काळ्या कपड्यांवर शक्यतो हलका मेकअप आणि कमीत कमी दागिने घालावेत.
२. काळ्या कपड्यांवर केस मोकळे सोडण्यापेक्षा वर बांधले तर आपला चेहरा आणि फिचर्स जास्त चांगली उठून दिसतात. तसेच ब्लाऊजला किंवा पंजाबी ड्रेसला छान काही डिझाईन असेल तर तीही खुलून येण्यास मदत होते. लांब केस असतील तर साधी किंवा पाचपेडी वेणी, आंबाडा घालून त्याला छानसा गजरा लावला तरी तुम्ही सगळ्यांमध्ये वेगळे आणि उठून दिसता.
३. काळ्या कपड्यांवर शक्यतो सोन्याचे दागिने न घालता बारीक मोत्याचे किंवा बारीक खड्यांचे दागिने छान दिसतात. इतकेच नाही तर ऑक्सिडाईजचे दागिनेही काळ्या कपड्यांवर उठून दिसतात. त्यामुळे दागिने घालताना ही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हवी.
४. काळे कपडे असतील तर मेकअप करतानाही तो जास्तीत जास्त लाईट असेल असे पाहावे. काळ्या रंगावर खूप गडद रंगाच्या लिपस्टीक, डोळ्यांचा हेवी मेकअप फारसा उठून दिसत नाही. त्यापेक्षा गुलाबी किंवा आबोली रंगाची फिकट लिपस्टीक आणि आयलायनर, आयशॅडो इतक्या गोष्टी पुरेशा असतात.