त्वचेचा कोरडेपणा, प्रदूषण, रासायनिक घटकांचा अतिवापर या कारणांमुळे आपल्या केसांत कोंडा होतो. एकदा कोंडा झाला की कितीही प्रय्तन केले तरी तो कमी व्हायचे नाव घेत नाही. केस विंचरले की कपड्यांवर पडणारा आणि केसांत हात घातला की हाताला लागणारा हा कोंडा म्हणजे आपली कोरडी पडलेली त्वचाच असते. कोंड्यामुळे केस तेलकट होणे, केसगळतीचे प्रमाण वाढणे आणि त्यामुळे केस विरळ व्हायला लागणे अशा समस्या उद्भवतात. आता हा कोंडा कमी करण्यासाठी बाजारातील रासायनिक उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी काय उपाय करता येतील ते पाहूया (How To Get Rid From Hair Dandruff).
१. लिंबाचा रस
केस धुण्याच्या आधी पाव कप पाण्यात १ चमचा लिंबाचा रस घालून ते पाणी केसांच्या मुळांना लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. लिंबामध्ये सायट्रीक अॅसिड असल्याने त्यातील अँटीमायक्रोबियल गुणधर्म कोडा दूर करण्यास मदत करतात. लिंबाच्या रसामुळे केसात बुरशी आली असेल किंवा तेलकटपणा असेल तर तो निघून जाण्यास मदत होते. लिंबाच्या वापरामुळे केसगळतीचे प्रमाण कमी होते आणि केस दाट आणि मजबूत होण्यासही मदत होते.
२. टी ट्री ऑईल
केसातला कोा कमी होण्यासाठी टी ट्री ऑईल अतिशय उपयुक्त ठरते. तेल लावल्याने केस चिपचिपीत होतात असे आपल्याला वाटत असते. पण टी ट्री ऑईलच्या वापराने केसांच्या मूळांशी असलेली घाण आणि कोंडा केसांना चिकटून निघून जाण्यास मदत होते. या तेलात असणाऱ्या अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी फंगल गुणधर्मांमुळे हे तेल अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतो. या तेलामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होत असल्याने केसांच्या एकूण आरोग्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते.
३. कॉफी
पावसाळ्यात आपल्याला वाफाळती कॉफी प्यायली की छान वाटते. तरतरी येण्यासाठी ज्याप्रमाणे आपण कॉफी पितो त्याचप्रमाणे केसांसाठीही कॉफी उपयुक्त ठरते. त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी कॉफीचा अतिशय चांगला उपयोग होतो. कोंडा होण्याचे कारण असलेले बॅक्टेरीया डोक्यातून काढून टाकण्याचे आणि केसांची मुळे स्वच्छ करण्याचे काम कॉफी करते. कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंटस केसांची हानी होऊ नये यासाठी उपयुक्त ठरतात. खोबरेल तेल थोडं गरम करुन त्यामध्ये कॉफी पावडर घालावी. हे मिश्रण थंड झाल्यावर संपूर्ण केसांना आणि केसांच्या मुळांशी लावावे. ३० मिनीटे तसेच ठेवून त्यानंतर केस हलक्या शाम्पूने धुवावेत.
४. लसूण
आपल्या किचनमध्ये सहज मिळाणारा हा पदार्थ सौंदर्यासाठीही उपयुक्त असतो. लसणामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरीयल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म केसांच्या मूळांना झालेले इन्फेक्शन दूर होण्यासाठी उपयुक्त ठरतात. लसणामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, मॅग्नेशियम, सेलेनियम, अमिनो अॅसिड असे गुणधर्म असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. कोरफडीचा गर आणि लसणाची पेस्ट एकत्र करुन हे मिश्रण १५ ते २० मिनीटांसाठी केसांना लावून ठेवायचे. त्यामुळे केस चांगले होण्यास मदत होते.