चामखीळ म्हणजे त्वचेचा एकप्रकारे वर आलेला भाग, कधीतरी आपल्याला मानेवर, चेहऱ्यावर किंवा अगदी शरीराच्या कोणत्याही भागात चामखीळ येते. या चामखीळीचा विशेष काही त्रास नसला तरी चेहऱ्याच्या आजुबाजूला किंवा मानेवर चामखीळ असेल तर मात्र आपल्या सौंदर्यात बाधा येते. काहींना तर एक दोन नाही बऱ्याच चामखिळी असण्याची शक्यता असते. विशेषतः वर्णाने गोऱ्या असणाऱ्या व्यक्तींच्या अंगावरील वा चेहऱ्यावरील चामखीळ पटकन दिसून येतात. पण चामखीळ नक्की का येतात? तर ह्यूमन पॅपोलोमा व्हायरस (HPV) – Human Papillomavirus हे चामखीळ येण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतात. चामखीळ नको म्हणून काही लोक ती घालवण्यासाठी घरगुती उपाय करतात. तर काही जण चामखीळ घालविण्यासाठी डॉक्टरांची मदतही घेताना दिसून येतात. पण जीवनशैलीत योग्य ते बदल केले तर चामखीळ येत नाही किंवा आली असेल तरी त्याचे प्रमाण कमी होते.
चामखीळीवर उपाय
१. आहार
चामखीळ एकदा आली की ती काढण्यापेक्षा ती होऊच नये किंवा झाली असेल तर त्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. आहाराच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यायला हवी. प्रोसेस केलेले अन्नपदार्थ, जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ, बेकरी उत्पादने टाळायला हवीत. आहारात दलिया, बाजरी, ज्वारी, छोले, राजमा यांसारखी धान्ये आणि कडधान्यांचा समावेश असायला हवा. जास्तीत जास्त फळे खायला हवीत. स्थानिक फळे आणि भाज्या यांचे प्रमाण आहारात वाढवणे आवश्यक आहे. प्रत्येक जेवणात प्रोटीन असेल याची काळजी घ्यायला हवी. दाणे, सुकामेवा यांच्या माध्यमातून फॅटस घेऊन तेलाचा कमीत कमी वापर करायला हवा. सलाड आहारात अतिशय महत्त्वाचे असून दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही जेवणात सलाडचा समावेश असायला हवा. यामुळे चामखीळ येण्याचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते.
२. व्यायाम
अनेकदा आपण व्यायामाला वेळ नाही असे म्हणतो आणि व्यायाम करणे टाळतो. मात्र आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर व्यायामाला पर्याय नाही. आपल्याला होईल तेवढा, शक्य त्या वेळेला काही ना काही व्यायाम जरुर करायला हवा. व्यायामामुळे इतर समस्यांबरोबरच चामखीळीची समस्याही कमी होण्यास मदत होईल.
३. झोप
उत्तम आरोग्यासाठी ७ ते ८ तासांची झोप प्रत्येकाला आवश्यक असते. मात्र ही झोप मिळाली नाही तर आपल्याला अॅसिडीटी, बद्धकोष्ठता, मानसिक ताण, अपचन, उष्णता अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. सध्या प्रत्येकालाच कामाचा ताण, सोशल मीडियाचा अतिवापर आणि अन्य काही गोष्टींमुळे झोप कमी मिळते. मात्र त्याचा परिणाम आपल्या सौंदर्यावरही होत असून त्वचा रुक्ष निस्तेज दिसण्यास सुरुवात होते. शरीरातील इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला तर ताणतणाव कमी होतात आणि चामखीळ येण्याची शक्यता आणि प्रमाण कमी होते. त्यामुळे रात्रीची पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते.