आपण गोरेपान असलो की सुंदर दिसतो असा आपला समज असतो. पण प्रत्यक्षात सौंदर्याचे असे कोणतेही ठोकताळे नसतात. सावळ्या महिलाही देखण्या आणि सुंदर दिसू शकतात. बरेचदा आपला रंग उजळ असतो पण उन्हात फिरुन किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापराने हा रंग काळा होतो. काहीवेळा यामागे इतरही काही कारणं असतात. पण चेहरा किंवा शरीराचा इतर भाग गोरा असेल आणि फक्त कोपरे, हाताच्या तळव्यांच्या मागचा भाग किंवा पायाच्या तळव्यांचा वरचा भाग काळा पडतो. अशाप्रकारे शरीराचा काही भाग काळा पडला की तो खराब दिसायला लागतो (How To Get Rid Of Dark Body Parts)...
मात्र असे होऊ नये आणि त्वचा एकसारखी नितळ, गोरीपान दिसावी यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस करतो. या ट्रिटमेंटसमध्ये विविध प्रकारची केमिकल्स वापरली जात असल्याने ती त्वचेसाठी घातक ठरु शकतात. डी टॅन, क्लिनअप, ब्लिच अशाप्रकारच्या ट्रिटमेंटसमुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. केवळ २ गोष्टी वापरुन एक सोल्यूशन तयार केल्यास काळे झालेली कोपरं, पाय, बोटं, मान उजळण्यास मदत होते. पाहूया हा सोपा उपाय कसा करायचा.
१. कोरफडीचा गर त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर असतो. कोरफड आपण अगदी घरातही लावू शकतो किंवा बाजारात याचा गर किंवा जेल सहज मिळते.
२. यामध्ये लिंबाचा रस पिळावा, लिंबात व्हिटॅमिन सी आणि सायट्रीक अॅसिड असल्याने त्वचा स्वच्छ होण्यास ते फायदेशीर असते.
३. हे दोन्ही चांगले एकजीव करुन काळ्या पडलेल्या कोपरं, गुडघे, बोटांचा मागचा भाग, पायाचा वरचा भाग याठिकाणी चोळून लावावे.
४. रात्री झोपताना हे मिश्रण लावून ठेवावे आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर धुवून टाकावे. त्यामुळे टॅनिंग निघून जाण्यास मदत होते.
५. अगदी २ च गोष्टींपासून तयार होणारे हे मिश्रण आपण एकदाच तयार करुन किमान १० ते १२ दिवसांसाठी स्टोअर करुन ठेवू शकतो.
६. चेहऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठीही आपण हे मिश्रण वापरु शकतो. मात्र त्याआधी पॅच टेस्ट आवर्जून करायला हवी.
७. कोरफडीच्या गरामुळे मॉईश्चरायजिंग तर होतेच पण टॅनिंग आणि त्वचेचा काळेपणा निघून जाण्यास मदत होते. तर लिंबामुळे काळे स्पॉटस निघण्यास फायदा होतो.