आपली त्वचा नितळ, मुलायम असावी असे प्रत्येकीला वाटते. पण काही ना काही कारणांनी चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, सुरकुत्या, कोरडेपणा यांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. पिंपल्स ही अनेक तरुणींसाठी एक मोठी समस्या असते. पिंपल्स आले की ना मेकअप करता येतो ना आणखी काही. पिंपल्समुळे तर चेहरा खराब दिसतोच पण ते गेल्यावरही त्याचे काळे डाग चेहऱ्यावर तसेच राहिल्याने चेहऱ्याची वाट लागते. यातच एखादे लग्न किंवा सणवार आले की मग तर काही विचारायलाच नको. सणावारांना आपल्याला छान नटूनथटून सगळीकड़े मिरवायचे असते. पण अशातच हे पिंपल्स आणि डाग आले की काय करावे ते कळत नाही. मात्र हे डाग घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात असेच काही उपाय (How To Get Rid Of Pimples Home Remedies For Pimples and Black Spots)...
१. हळद आणि बेसन
हा पारंपरिक उपाय़ असून त्याचा डाग जाण्यासाठी चांगला उपयोग होतो. १ चमचा बेसन, चिमुटभर हळद आणि गुलाब पाणी एकत्र करुन त्याचा लेप चेहऱ्यावर एकसारखा लावा. हा लेप वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्यास त्याचा फायदा होतो. मात्र पिंपल्स येण्याआधीपासूनच रोज तुम्ही हा उपाय केल्यास पिंपल्सपासून आणि डागांपासून तुमची सुटाक होऊ शकते.
२. हळद आणि साय किंवा दूध
१ चमचा सायीमध्ये चिमुटभर हळद घालून ती फक्त पिंपल्स असतील त्याच ठिकाणी लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर पूर्ण सुकू न देता अर्धवट सुकू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय शक्यत रात्री झोपताना केल्यास उत्तम. जेणेकरुन रात्रभराचे ७ ते ८ तास चेहरा प्रदूषणापासून दूर असतो. पिंपल्स आलेले असताना आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा, म्हणजे पिंपल्स पसरणार नाहीत आणि त्याचे काळे डागही फारसे पडणार नाहीत.
३. गुलाबपाणी
गुलाबपाणी सौंदर्यासाठी अतिशय उत्तम काम करते हे आपल्याला माहित आहे. एका कापसाच्या बोळ्यावर गुलाब पाणी घेऊन तो बोळा पिंपल्सवर ठेवा. हे पाणी तसेच आपल्या चेहऱ्यावर सुकू द्या. रात्री झोपताना हा उपाय केला तरीही चालेल म्हणजे हे पाणी जास्त काळ चेहऱ्यावर राहील. आपल्या चेहऱ्याला कोणती उत्पादने सूट होतात असा प्रश्न पडल्याने तुम्ही कोणतीच उत्पादने वापरत नसाल तर गुलाब पाणी हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे हे लक्षात घ्या. दररोज हा उपाय केल्यास एका आठवड्यात चेहरा ग्लो करण्यास सुरुवात होईल.
४. मध आणि हळद
हार्मोन्समध्ये होणारे बदल, पिरीयडस, तेलकट किंवा मसालेदार आहार आणि अपुरी झोप यांसारख्या कारणांनी आपल्या चेहऱ्यावर अनेकदा पिंपल्स येतात. हे पिंपल्स कमीत कमी वाढावेत आणि पसरावेत म्हणून मध आणि हळद हा अगदी उत्तम उपाय ठरतो. १ चमचा मधात चिमूटभर हळद घालून ज्याठिकाणी पिंपल आला आहे त्याठिकाणी ही पेस्ट लावायची. १० ते १५ मिनीटे हे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय केला तरी चालतो.