आपली त्वचा नितळ आणि चमकदार हवी असं प्रत्येकीला वाटतं. पण कधी वातावरणाचा परिणाम, कधी प्रदूषण, अन्नातून पुरेसे पोषण न मिळणे, पाणी कमी पिणे किंवा अन्य काही कारणांनी आपली त्वचा रुक्ष होते, कधी त्यावर खूप फोड येतात, डाग पडतात. यांपैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. आता या समस्या दूर करण्यासाठी नेमके काय करायला हवे हे आपल्याला माहित असले तरी आपल्याकडून ते फॉलो केले जात नाही. (How To Look Beautiful Naturally) मात्र आज आपण अशा काही सोप्या टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे आपली त्वचा नितळ आणि चमकदार व्हायला मदत होईल. विशेष म्हणजे या सोप्या गोष्टी केल्याने आपल्याला सतत पार्लरमध्ये तर जावं लागणार नाहीच पण मेकअप करण्यासाठी महागडी प्रॉडक्टही वापरावी लागणार नाहीत.
१. सनस्क्रीन लोशन
घरातून ऑफीसला किंवा बाहेरच्या कामाला निघण्याच्या घाईत आपण केस विंचरतो बाकी गोष्टी आवरतो आणि तसेच बाहेर पडतो. मात्र असे केल्याने आपल्या त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. सूर्याची अतिनील किरणे प्रखर असतात. ती थेट चेहऱ्यावर पडली तर त्वचा काळवंडते, रॅश येतात. त्यामुळे न विसरता घराबाहेर पडताना चेहऱ्याच्या सर्व भागावर, मान, गळा, कान या भागांवरही चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लोशन लावायला हवे.
२. मॉईश्चरायजर
मॉइश्चरायजरमुळे आपल्या त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. त्वचा सतत धूळ, हवा, ऊन यांच्या संपर्कात आल्याने कोरडी पडते. मग नकळत त्वचा रुक्ष दिसायला लागते. पण त्वचेच्या वरच्या थरात मॉईश्चर चांगले टिकून राहिले तर त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर, दुपारी किंवा संध्याकाळी चेहरा धुतल्यावर आणि रात्री झोपताना न चुकता दिवसातून किमान तीन वेळा चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावायला हवे.
३. स्क्रबिंग
आपण अनेकदा फेसवॉश किंवा साबण लावून चेहरा धुतो. पण त्यामुळ चेहऱ्यावरील सगळी घाण निघून जातेच असे नाही. त्वचेच्या रंध्रांमध्ये हवेतील घाण अडकते आणि त्यामुळे व्हाईट हेडस, ब्लॅक हेडस, पुटकुळ्या येण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्या त्वचेला सूट होणारे चांगल्या दर्जाचे स्क्रबर वापरा आणि चेहरा ग्लो होईल असा प्रयत्न करा. त्वचा स्वच्छ आणि तुकतुकीत होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
४. फेसमास्क
फेसमास्क म्हणजे चेहऱ्याला काही झाले असल्यास उपाय म्हणून लावायची गोष्ट किंवा फेसमास्क हा फक्त पार्लरमध्येच लावायचा असतो असा आपला समज असतो. मात्र प्रत्यक्षात तसे नसून आपण घरच्या घरी साध्या घरगुती गोष्टी वापरुन हा फेसमास्क तयार करु शकतो. फेसमास्क नियमीत लावल्यास त्वचेला तजेलदारपणा येतोच पण त्वचेचा टाइटपणा टिकून राहण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो.
५. मेकअप रिमूव्ह करणे
अनेकदा आपण आहे त्याहून उजळ दिसण्यासाठी मेकअप करतो. यामध्ये काजळ, लायनर, मस्कारा, कॉम्पॅक्ट, प्रायमर, लिपस्टीक अशा किमान गोष्टी चेहऱ्याला लावतो. पण रात्री घरी आल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून या गोष्टी योग्य पद्धतीने चेहऱ्यावरुन काढायला हव्यात. यामध्ये केमिकल्स असल्याने या गोष्टी जास्त काळ चेहऱ्यावर राहिल्यास चेहरा खराब होण्याची शक्यता असते.