How to make Gulab Jal : त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे घरगुती उपाय करत असतात. कुणी दूध आणि हळदीचा वापर करतात, तर कोरफडीचा, तसेच दही आणि मधाचाही वापर अनेकजण करतात. या सगळ्या गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर असतात. बरेचजण गुलाबजलाचा वापर करतात. कारण याचेही त्वचेला अनेक फायदे मिळतात.
सामान्यपणे जास्तीत जास्त महिला गुलाब जल बाजारातून विकत आणतात. पण तुम्हाला जर घरीच गुलाबजल तयार करण्याची पद्धत सांगितली तर तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला फ्रेश गुलाबजलही मिळेल. त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. जो बघून तुम्ही घरच्या घरी कमी पैशात फ्रेश गुलाबजल तयार करू शकता.
गुलाबजल तयार करण्याची पद्धत
ब्युटी अॅन्ड व्हॉग नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात घरच्या घरी गुलाबजल तयार करण्याची सोपी पद्धत सांगण्यात आली आहे. व्हिडिओत सांगण्यात आल्यानुसार, काही गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या काढा. या पाकळ्या पाण्यातून धुवून घ्या. त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवा आणि त्यात मधोमध एक छोटी वाटी ठेवा. नंतर राउंडमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाक्या. वरून पाकळ्या हलक्या बुडतील इतकं साधारण एक ग्लास पाणी टाका. त्यानंतर एक स्टीलची वाटी भांड्याच्या आणि पाकळ्यांच्या मधोमध ठेवा. हे झाल्यानंतर एक छिद्र असलेली लीड घेऊन भांड्यावर उलटी ठेवायची आहे. त्यावर काही आइसक्यूब ठेवायच्या आहेत. त्यानंतरच गॅस सुरू करायचा आहे. 10 ते 12 मिनिटं गॅस सुरू राहू द्या. 10 ते 12 मिनिटांनंतर लीड बाजूला केल्यावर आतील वाटीत तुम्हाला गुलाब जल जमा झाल्याचं दिसून येईल. जे तुम्ही बरेच दिवस स्टोर करू शकता. पण खाली पाकळ्यांचं लाल पाणी तुम्ही जास्त दिवस स्टोर करू शकणार नाहीत. ते तुम्हाला लगेच वापरावं लागेल. अशाप्रकारे तुमचं घरगुती फ्रेश गुलाबजल तयार आहे.
गुलाबजलाचे फायदे
- जर तुमची त्वचा खूप ड्राय राहत असेल तर तुम्ही गुलाबजल लावून ही समस्या दूर करू शकता. यानं त्वचा मुलायम राहते आणि हायड्रेटेड राहते.
- कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं गुलाबजल लावून तुम्ही चेहरा साफ करू शकता. यानं चेहरा मुलायम आणि ग्लोईंग दिसेल.
- गुलाब जलमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात, ज्यामुळं त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून होणारं नुकसान टाळता येतं.
- रोज नियमितपणे जर त्वचेवर गुलाबजल लावलं तर यानं त्वचेची पीएच लेव्हल बॅलन्स राहते.
- गुलाब जलमध्ये अॅंटी-सेप्टीक आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. ज्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा अॅक्ने येत नाहीत.
- गुलाबजल त्वचेसाठी नॅचरल टोनरसारखं काम करतं. याचा वापर तुम्ही मेकअप काढण्यासाठीही करू शकता. सोबतच यानं त्वचेला थंडावाही मिळतो.
- ओठांची साल निघत असेल किंवा ओठ कोरडे झाले असतील तर गुलाबजल लावू शकता. यानं ओठ मुलायम होतील आणि ओठांची सालही निघून जाईल.