पावसाळा संपून थंडीला सुरुवात होते आणि दिवाळीच्या दरम्यान येणाऱ्या थंडीच्या दिवसांत हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे वातावरणात एकप्रकारचा कोरडेपणा येतो. या कोरडेपणामुळे थंडीच्या दिवसांत त्वचा खूप कोरडी पडायला लागते. कोरड्या झालेल्या त्वचेला खाज येणे, तडतडणे, आग होणे अशा समस्या निर्माण होतात. कधीकधी तर त्वचा इतकी कोरडी होते की खाजवल्यामुळे त्याचा कोंडा निघतो आणि काहीवेळा रक्तही येते. मग हा कोरडेपणा कमी होण्यासाठी आपण आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश करतो. तसेच त्वचा मऊ राहण्यासाठी त्याला तेल, बॉडी लोशन असे काही ना काही लावतो (How to make homemade body lotion for winter).
बाजारात मिळणाऱ्या बॉडी लोशनमध्ये रासायनिक घटक असतात. तसेच या लोशनची किंमतही खूप जास्त असते. म्हणूनच ही विकतची बॉडीलोशन खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी बॉडी लोशन तयार केले तर? अगदी झटपट होणारे हे बॉडी लोशन घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच तयार करता येते.त्यासाठी विशेष खर्चही होत नाही. तर पाहूया घरच्या घरी काही मिनीटांत बॉडी लोशन तयार करण्याची सोपी पद्धत...
१. सगळ्यात आधी एका वाटीत साधारण १ चमचा बोरोलिन घ्या
२. त्यामध्ये व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सुल घाला. या कॅप्सुल कुठेही सहज मिळतात
३. त्यात अर्धा चमचा ग्लिसरीन घाला.
४. मग यामध्ये ७ ते ८ चमचे कोरफडीची जेल घाला.
५. यात आपल्याकडे असेल ते कोणतेही सनस्क्रीन १ चमचा घालून हे सगळे मिश्रण चमच्याने चांगले एकजीव करा.
६. चमच्याने एकजीव होत नसेल तर हा बाऊल गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते एकजीव होण्यास मदत होईल.
७. तयार झालेले हे लोशन एका बाटलीमध्ये भरुन ठेवा आणि लागेल तेव्हा हातावर घेऊन ते अंगाला, चेहऱ्याला लावा.