Join us  

केमिकलयुक्त काजळ वापरुन डोळे खराब करण्यापेक्षा वापरा बदामाचं काजळ.. घरच्याघरी तयार करण्याची घ्या सोपी पध्दत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 8:01 PM

बाहेरच्या केमिकलयुक्त काजळानं डोळ्यांचं सौंदर्य वाढत असलं तरी डोळ्यांचं आरोग्य मात्र धोक्यात येतं. डोळे सुरक्षित राखून डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी बदाम आणि साजूक तुपाचा वापर करुन घरच्याघरी काजळ (home made kajal) तयार करता येतं. 

ठळक मुद्देबदामाचं काजळ नियमित वापरल्यानं दृष्टी सुधारते. डोळे जळजळणं, खाज येणं या समस्या डोळ्यात बदामाचं काजळ लावल्यानं दूर होतात. 

डोळ्यात काजळ घातल्यानं डोळ्यांचं सौंदर्य तर वाढतंच पण काजळामुळे पूर्ण लूकच बदलून जातो. पण बाहेर मिळणारं केमिकलयुक्त काजळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक समजलं जातं. असं केमिकलयुक्त काजळ वापरल्यानं डोळ्यांना खाज येणं, डोळे लाल होणं, नजर कमी होणं एवढ्या गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. हे टाळण्यासाठी काजळ वापरु नये असं नाही तर घरच्याघरी काजळ (homemade kajal)  तयार करुन ते लावणं हा त्यावरचा उपाय आहे. लहान मुलांसाठी बऱ्याचदा घरी काजळ केलं जातं. केमिकलचे साइड इफेक्ट टाळण्यासाठी  घरच्या घरी अनेक ब्यूटी प्रोडक्टस तयार करता येतात. तसंच मोठेपणी डोळ्यात सौंदर्यासाठी लावण्यात येणारं काजळ सहज घरी (how to make kajal at home)  करता येतं. सौंदर्य आणि डोळ्यांचं आरोग्य या दुहेरी फायद्यासाठी  बदाम आणि साजूक तुपापासून डोळ्यांसाठी फायदेशीर असं काजळ ( homemade kajal from almond)  तयार करता येतं. 

Image: Google

बदामापासून काजळ कसं तयार करावं?

बदामापासून काजळ तयार करण्यासाठी आधी दिवा पेटवावा. एक बदाम घ्यावा.  फोर्क बदामात पकडून तो दिव्यावर धरावा. बदाम दिव्यावर जाळताना वर चमचा उलटा धरावा. बदाम जळत जाईल तशी चमच्यावर काजळी जमा होते. ही काजळी एका छोट्या डब्बीत जमा करावी. बदाम जाळून झाल्यानंतर या काजळीत थोडंसं साजूक तूप घालून ते चांगलं एकत्र करावं. हे काजळ डोळ्यांचं सौंदर्य तर वाढतंच आणि डोळ्यांचं आरोग्यही चांगलं राहातं.

Image: Google

बदामाचं काजळ वापरल्याने..

1. बदामाचं काजळ डोळ्यांसाठी सुरक्षित असतं. बदामात अ आणि इ ही जीवनसत्व असतं.  बाहेरचं केमिकलयुक्त काजळ वापरल्यानं त्याचा पुढे जाऊन दूष्टीवर नकारात्मक परिणाम होतो. मात्र बदामाचं काजळ नियमित वापाल्यानं दृष्टी सुधारते. 

2. बदामाचं काजळ डोळ्यात घातल्यानं डोळे शांत राहातात. डोळ्यांना थंडावा मिळतो.  डोळ्यांना खाज येणं, डोळे जळजळणं या समस्या दूर होतात.  बदामाच्या काजळानं डोळ्यांना आराम मिळतो. 

3. बदामाचं काजळ डोळ्यात घातल्यानं डोळे सुंदर दिसतात. पापण्यांचे केस वाढतात. डोळ्यांना छान चमक येते.  घरी तयार केलेलं बदामाचं काजळ वापरल्यानं कोणतेही साइड इफेक्ट होत नाही.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी