आपला चेहरा नितळ आणि सुंदर असावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण काही ना काही कारणांनी चेहऱ्यावर पिंपल्स किंवा फोड येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. एकदा चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात झाली की ते लवकर कमी होत नाहीत. प्रदूषण, पोट साफ नसणे, केमिकल असलेल्या उत्पादनांचा वापर, चुकीचा आहार यांमुळे चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येतात. या फोडांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते आणि मग मेकअप करुन आपल्याला ते झाकावे लागतात. काही वेळा हे फोड दुखणारे असतात तर काही वेळा त्यांच्यामुळे चेहऱ्यावर डागही पडतात (How To Make Neem Face Pack for Pimples and Acne).
बरेचदा काही ब्युटी प्रॉडक्टस लावूनही हे डाग आणि फोड जात नाहीत. अशावेळी घरच्या घरी पारंपरीक गोष्टींपासून काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर असलेल्या कडुलिंबाचा यासाठी चांगला फायदा होतो. चैत्र पाडव्याला आपण आंघोळीच्या पाण्यात आवर्जून कडुलिंब घालतो. त्वचेचे विकार दूर होण्यासाठी तो फायदेशीर असतो. याच कडुलिंबाचा वापर करुन तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला लावला तर पिंपल्स आणि फोड तर कमी होतीलच पण चेहराही ग्लोईंग दिसण्यास त्याची मदत होईल. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा यासाठी कसा वापर करायचा ते पाहूया...
१. कडुलिंबाची पानं काढून ती पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची.
२. ही पानं मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये कोरफडीचा गर आणि अर्धा टोमॅटो घालायचा.
३. मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करुन घ्यायची.
४. त्यामध्ये चमचाभर मध आणि तांदळाची पीठी घालायची.
५. सगळे मिश्रण चांगले एकजीव झाले की चेहऱ्यावर आणि मानेवर ज्याठिकाणी पिंपल्स आहेत तिथे लावायचे.
६. साधारण २० मिनीटे हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचा.
७. कडुलिंब आणि टोमॅटो, कोरफडीचा गर यांमुळे पिंपल्स निघून जाण्यास मदत होते आणि त्वचा ग्लोईंग दिसण्यास त्याची मदत होते.