त्वचेच्या किंवा डोळ्यांच्या तक्रारीसाठी अनेकदा गुलाब पाणी म्हणजेच गुलाब जल वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्वचा नितळ, सुंदर आणि उजळ होण्यासाठी हे गुलाब पाणी फायदेशीर ठरते. चेहेऱ्यावरील डाग, मुरुम पुटकुळ्या या समस्यांवर गुलाब पाणी चांगला उपाय ठरतो. विविध प्रकारचे फेस पॅक तयार करण्यासाठी साध्या पाण्याऐवजी गुलाब पाणी आवर्जून वापरले जाते. बरेचदा आपण बाजारातून गुलाब पाण्याची बाटली आणतो आणि तेच पाणी वापरतो.
पण बाहेरुन विकत आणलेल्या गुलाब पाण्याच्या शुध्दतेची खात्री मात्र देता येत नाही, त्यात भेसळीची शक्यता असू शकते. काहीवेळा यामध्ये काही रासायनिक घटक असतील तर त्याचा आपल्या त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. तुम्हीही त्वचेसाठी किंवा आणखी कोणत्या गोष्टींसाठी गुलाब पाण्याचा वापर करत असाल तर विकत आणण्यापेक्षा अगदी १५ मिनीटांत हे गुलाब पाणी आपण घरच्या घरी तयार करु शकतो( How To Make Rose Water at Home and Its Benefits ).
घरी गुलाब पाणी करण्याची सोपी पद्धत
१. गुलाब स्वच्छ धुवून त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या. यासाठी गावठी गुलाब वापरलेले जास्त चांगले.
२. गॅसवर एक कढई ठेवून त्याच्या मध्यभागी एक काचेची किंवा स्टीलची वाटी ठेवायची. आणि त्याच्या बाजुने गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या.
३. या पाकळ्या भिजतील इतकेच पाणी घालून गॅस लावायचा आणि कढईवर झाकण ठेवायचे.
४. गुलाबपाणी चांगले व्हावे यासाठी कढईवरच्या झाकणावर बर्फाचे २-३ तुकडे आणि झाकणाला एखादे होल असेल तर त्याठिकाणी थोडी कणीक लावायची.
५. १५ ते २० मिनीटे हे चांगले उकळल्यानंतर गुलाबाचा अर्क यामध्ये चांगल्या पद्धतीने मिसळला जातो.
६. वाफेमुळे मध्यभागी असलेल्या बाऊलमध्ये हे पाणी जमा होते. गॅस बंद केल्यानंतर या बाऊलमधले पाणी एखाद्या बरणीत भरुन ठेवायचे.
गुलाब पाण्याचे फायदे
१. त्वचेला थंडावा मिळण्यासाठी आणि त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत गुलाब पाणी चेहऱ्याला लावणे फायदेशीर ठरते.
२. अनेकदा कॉम्प्युटरवर बसल्याने किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ होणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी कापसावर गुलाब पाणी घेऊन ते डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.
३. डार्क सर्कल आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी गुलाबपाण्याचा चांगला उपयोग होतो. त्वचा मुलायम आणि टाइट करण्यासाठीही गुलाबपाणी फायदेशीर असते.
४. गुलाब पाणी केवळ सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त असते. गुलाबाच्या पाकळ्यातील पोषक घटकांमुळे पचनव्यवस्था मजबूत होते. गुलाबपाण्यापासून तयार केलेला हर्बल टी प्याल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात.