सणावारांना आपल्याला घरातला स्वयंपाक, पूजा, येणारे जाणारे पाहुणे असं सगळं काही ना काही करायचं असतं. त्यातच आपणही छान दिसावं असं प्रत्येकीला वाटतं. अचानक एकाद्या दिवशी आपण चांगले दिसू असं होत नाही. तर आधीपासून आपण त्वचेची, केसांची योग्य पद्धतीने काळजी घेत असू तर ऐनवेळी आपण नक्कीच चांगले दिसू शकतो. चेहऱ्यावर अनेकदा पिंपल्स येणे, डाग पडणे, त्वचा कोरडी होणे अशा समस्या निर्माण होतात. ऐनवेळी आपल्याला काहीच करता येत नसल्याने मेकअप करुन आपल्याला या गोष्टी झाकाव्या लागतात (How To Make Saffron Skin Care Cream At Home).
मात्र मेकअपपेक्षा अनेकदा आपण नॅचरल लूकमध्येच जास्त चांगले दिसतो. किंवा आपल्याकडे बाकी गोष्टी करता करता मेकअपसाठी पुरेसा वेळ नसतो. अशावेळी नुसते काजळ आणि लिपस्टीक लावली तरी पुरे होते. मात्र त्यासाठी त्वचा छान नितळ असायला हवी. त्यामुळे नैसर्गिकरित्या चेहरा चांगला दिसावा यासाठी रोज रात्री झोपताना एक खास क्रिम लावले तर त्वचा नितळ आणि सतेज होण्यास मदत होते. केशराचा वापर करुन केले जाणारे हे क्रिम तयार करण्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक अशाच गोष्टींचा वापर आपण करणार आहोत. हे खास क्रिम कसे तयार करायचे पाहूया..
१. एका टिश्यू पेपरमध्ये केशराच्या ८ ते १० काड्या घ्यायच्या आणि याची नीट घडी घालायची. ही घडी तव्यावर ठेवून थोडी कोमट करुन घ्यायची.
२. हे गरम झालेले केशर एका लहानशा बरणीत काढायचे आणि त्यामध्ये २ चमचे कोरफडीचा गर घालायचा.
३. त्यानंतर आपण त्वचेला लावतो ते बदामाचे १ चमचा तेल आणि इ व्हिटॅमिनच्या २ कॅप्सूल घालायचे.
४. यामध्ये १ चमचा गुलाबाचे पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यायचे.
५. पिवळ्या रंगाचे हे घट्टसर क्रिम आपण २ आठवड्यांसाठी फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकतो.
६. रोज रात्री झोपताना हे क्रिम चेहऱ्याला आणि मानेला सगळीकडे लावायचे आणि रात्रभर चेहऱ्यावर ठेवून सकाळी चेहरा धुवून टाकायचा.
फायदे
१. चेहरा उजळ होण्यास यातील सर्व घटकांचा अतिशय चांगला फायदा होतो.
२. सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावर एकप्रकारचा ग्लो येण्यास मदत होते.
३. चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट असतील तर ते निघून जाण्यास मदत होते.
४. त्वचा वयस्कर दिसत असेल तर ती तशी दिसू नये यासाठी या क्रिमचा फायदा होतो.