Join us  

ग्लोईंग चेहऱ्यासाठी घरच्या घरीच तयार करा सिरम; नैसर्गिक पदार्थांनी त्वचेवर येईल खास चमक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2023 10:34 PM

How To Make Serum At Home : पाहूया घरच्या घरी सिरम करण्याची सोपी पद्धत...

ठळक मुद्देसिरममुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि त्वचा ग्लो करते. पाहूया घरच्या घरी सिरम तयार करण्याच्या सोप्या पद्धती

आपला चेहरा छान चमकदार असावा यासाठी आपण नेहमी काही ना काही उपाय करत असतो. आपल्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. त्वचेचा बाहेरील प्रदूषण, धूळ, सूर्यप्रकाश या गोष्टींशी सतत संपर्क येतो आणि ती खराब होते. चेहरा हा सौंदर्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असून तो ग्लोईंग दिसावा म्हणून आपण पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस तर करतोच पण विविध प्रकारची ब्यूटी प्रॉडक्ट वापरुन चेहऱ्याचे सौंदर्या वाढवण्याचा प्रयत्न करतो, सिरम हे अशाच प्रॉडक्टपैकी एक. बाजारात विविध कंपन्यांची सिरम मिळतात. त्वचेचा ग्लो कायम ठेवण्यासाठी वापरली जाणारी ही सिरम घरच्या घरीही तयार करता येतात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र याबद्दलची माहिती देतात. पाहूया घरच्या घरी सिरम कसे तयार करायचे (How To Make Serum At Home). 

(Image : Google)

१. कोरड्या त्वचेसाठी 

१ चमचा खोबरेल तेल, १ चमचा मध आणि १ चमचा कोरफडीचा गर एकत्र करावे. हे मिश्रणाचे ३ ते ४ ड्रॉप्स चेहऱ्यावर एकसारखे लावावेत. उरलेले मिश्रण आपण एका डबीत भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकतो. आवश्यक तेव्हा हे सिरम आपण वापरु शकतो. कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉईश्चरायजरप्रमाणे काम करत असल्याने उन्हात किंवा बाहेर जाताना त्यांचा फायदा होतो.

२. तेलकट त्वचेसाठी 

१ चमचा टोमॅटो ज्यूस आणि १ चमचा मध एकत्र करा. चेहरा स्वच्छ करुन रोज सकाळी आणि संध्याकाळी सिरम लावायला हवे. त्यामुळे त्वचेचा पोत दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होते. टोमॅटो ज्यूस तेलकट त्वचा ग्लोईंग दिसण्यास मदत करतो, तसेच अॅस्टींजंट इफेक्टमुळे त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते. तर मधामुळे जास्त प्रमाणात सिबमची निर्मिती होत असेल तर ती आटोक्यात येण्यास मदत होते. तसेच पिंपल्स आणि पुटकुळ्या कमी करण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

३. सेन्सिटीव्ह त्वचेसाठी 

काही जणांची त्वचा खूपच हळवी असते. अशावेळी सिरम तयार करताना फक्त साखर आणि कोरं दूध यांचा वापर करावा. १ चमचा साखर घेऊन त्यात ३ चमचे दूध घालून ते एकजीव करावे आणि चेहऱ्यावर लावावे. कच्च्या दुधामुळे त्वचेचे पोषण होण्यास मदत होते आणि साखरेमुळे त्वचेवरील घाण निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे  नियमितपणे दिवसातून २ वेळा त्वचेला हलक्या हाताने सिरम लावावे. नंतर चेहऱ्यावर हलके फटके मारावेत म्हणजे ते त्वचेमध्ये चांगल्या पद्धतीने मुरते. सिरममुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि त्वचा ग्लो करते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी