अनेक जणींच्या गालावर किंवा नाकावर काळे डाग येतात. सुरुवातीला तिळासारखा असणारा हा डाग वाढत जातो आणि हळूहळू नाक, गाल असं सगळंच डागाळून जातं. चेहऱ्यावरचे हे वांग कमी असतानाच त्यावर उपाय करावा. अन्यथा हे डाग वाढत जाऊन सगळा चेहराच काळवंडून टाकतात. म्हणूनच हे घ्या त्यावरचे काही घरगुती उपाय ( home remedies for dark spots)...
१. बटाट्याचा रस
बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. वांगाच्या समस्येवर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो. हा उपाय करण्यासाठी बटाट्याची सालं काढा आणि तो किसून घ्या. यानंतर तो पिळून त्याचा रस काढा. हा रस वांगाच्या डागावर लावा. १० मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन- तीन वेळेस हा उपाय करावा.
२. दही किंवा ताक
वांगाच्या डागासाठी दही देखील अतिशय उत्तम उपाय ठरते. दह्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्याने वांग आलेल्या जागेवर थोडी मसाज करा. १० ते १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन- तीन वेळा हा उपाय करावा.
३. केळीचा फेसपॅक
केळीचा फेसपॅक वांगाचे डाग कमी करण्यास मदत करतो. यासाठी अर्धी केळी घ्या. त्यात दोन टी स्पून मध टाका. केळ आणि मध व्यवस्थित स्मॅश करा. हे मिश्रण डागांवर चोळून चोळून लावा. यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका.
४. हळकुंड आणि जायफळ
हळकुंड आणि जायफळ दूध टाकून सहानीवर उगाळून घ्या. हा लेप वांगाच्या डागांवर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास वांगाचे डाग लवकरच कमी होतात आणि हळूहळू निघून जातात.